ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट मतदारसंघात चुरशीच्या लढाईत कोण मारणार बाजी ?

आमदार कल्याणशेट्टी विरुद्ध म्हेत्रे लढतीकडे लक्ष

अक्कलकोट वृत्तसंस्था 

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच मुख्य  लढत याठिकाणी असून त्यात रासप, मनसे,आणि वंचितची भूमिकाही निर्णय  ठरणार आहे.आज तालुक्यात सर्वत्र  मतदान होत आहे.आमदार सचिन

कल्याणशेट्टी यांच्यासाठी प्रतिष्ठेची तर माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे व सिद्रामप्पा पाटील यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची ठरणार आहे. यावेळी म्हेत्रे

यांच्या बाजूने सिद्रामप्पा पाटील आल्याने निवडणुकीची समीकरणे थोडी बदलली आहेत.आमदार सचिन कल्याणशेट्टी हे गेल्या वेळी नवखे होते.तरी प्रचार कार्यात आघाडी घेऊन म्हेत्रे यांचा पराभव केला होता.यावेळी माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या भूमिकेने ही निवडणूक चुरशीची व अटीतटीची बनली आहे.

या मतदारसंघात एकूण ३ लाख ८६  हजार मतदार असून या मतदारांच्या हाती बारा उमेदवारांचे भवितव्य राहणार आहे. या निवडणुकीमध्ये संतोषकुमार इंगळे (वंचित बहुजन आघाडी) सिद्धाराम सातलिंगप्पा म्हेत्रे (काँग्रेस),  पूजा पाटील (अपक्ष ), शिवलिंगप्पा वंगे (अपक्ष), प्रसाद बाबानगरे (अपक्ष), सुनील बंडगर (राष्ट्रीय समाज पक्ष), इकरार हसन शेख (बहुजन समाज पार्टी), सचिन कल्याणशेट्टी (भारतीय जनता पक्ष ) ,मल्लिनाथ शरणप्पा पाटील (महाराष्ट्र नवनिर्माण सेना ), ज्ञानोबा साळुंखे (अपक्ष ), सिद्धाराम कोळी (अपक्ष ),जमीर याकूबसाब शेख (प्रहार जनशक्ती पार्टी) हे उमेदवार उतरले आहेत. यात पाच अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

या मतदारसंघात काँग्रेसने पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तर दुसऱ्या टप्प्यात कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के शिवकुमार यांची सभा लावली. भाजपने पहिल्या टप्प्यात माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे तर दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांची जाहीर सभा लावली. नंतरच्या काळामध्ये भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर तर काँग्रेसकडून खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार प्रणिती शिंदे यांच्या सभा लागल्याने निवडणुकीतील चुरस आणखीनच वाढत गेली. मतदानाची प्रक्रिया अगदी काही तासांवर येऊन ठेपली आहे त्यामुळे प्रत्येक जण आता मतदानाची तयारी करू लागला आहे.जाहीर प्रचार सोमवारी सायंकाळी पाच वाजता समाप्त झाला. त्यामुळे उद्या दिवसभर जेवढा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये आपल्या पक्षाला जास्त मतदान कसे होईल या दृष्टीने प्रयत्न राहणार आहेत. भाजप, काँग्रेस, अपक्ष, वंचित आणि मनसे, रासप यामध्ये ही लढत आहे.अपक्ष उमेदवारही आपापल्या पद्धतीने ग्रामीण भागात प्रचार यंत्रणा राबविली.

या निवडणुकीत उजनीच्या पाण्याचा मुद्दा खूप गाजला. रस्त्याचे मुद्दे चर्चेत आले. औद्योगिक सुविधा हाही मुद्दा चर्चेत राहीला. भाजप, काँग्रेस, रासप, वंचितकडून शेवटच्या टप्प्यात उमेदवारांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढली. दोन्ही प्रमुख पक्षांकडून ‘अभी नही तो कभी नही’ अशी चुरस प्रचाराच्या बाबतीत पाहायला मिळाली. काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांमध्येच प्रचारसभा घेण्यावरून चढाओढ दिसून आली.महायुतीचे उमेदवार कल्याणशेट्टी विरुद्ध म्हेत्रे यांच्यात व्यक्तिगत पातळीवरच मोठ्या प्रमाणात  प्रचार यंत्रणा राबवल्याचे चित्र दिसून आले.

१९९८ पासून ग्रामीण भागात म्हेत्रे यांचे वलय आहे. या वलयाला पुन्हा एकदा सुरुंग लावण्यासाठी भाजपने जोरदार रणनीती आखली आहे.आता या चुरशीच्या लढाईत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.यावेळी कसल्याही परिस्थितीत काँग्रेसला परिवर्तनाची अपेक्षा आहे तर भाजपला पुन्हा एकदा विजय  मिळेल अशी आशा आहे.या चुरशीच्या  लढाईत चांगल्या मतदानाबरोबरच आता निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली  आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!