सोलापूर, वृत्तसंस्था
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाच्या धोरणाविरोधात काम करणाऱ्या सोलापुरातील दोन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना मोठा झटका दिला आहे. शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्या सहीने या दोन पदाधिकाऱ्यांवरील कारवाईचे पत्रक जाहीर करण्यात आले आहे. शिवसेनेचे सोलापूर शहरप्रमुख मनोज शेजवळ आणि शिवसेनेचे युवा जिल्हाप्रमुख उमेश गायकवाड यांना तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या नेत्यांची नावे आहेत. विधानसभा निवडणूक मतदानाच्या एक दिवस ही कारवाई केल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे.
विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर प्रमुख मनोज शेजवळ आणि पक्षाचे युवा जिल्हाप्रमुख उमेश गायकवाड यांना शिवसेना पक्षाच्या धोरणाविरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे शेजवळ आणि गायकवाड यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. सोलापूर शहर मध्य मतदारसंघात सोलापूर शहर प्रमुख मनोज शेजवळ यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार, विद्यमान उमेदवार नरसय्या आडम मास्तर यांना पाठिंबा दिला आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर उत्तर मतदारसंघातील उमेदवार महेश कोठे यांना पाठिंबा दिला होता.
शेजवळ यांच्याशिवाय शिवसेनेचे युवा जिल्हाप्रमुख उमेश गायकवाड यांनीही या विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. गायकवाड यांनी महायुती धर्माच्या विरोधात जाऊन हा निर्णय घेतल्याने त्यांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.