ध्यास विश्वसार्ह बातमीचा

टीम इंडिया अस समजून काम करा ; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

मुंबई : मेट्रो कारशेडच्या कामाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना मेट्रो कारशेडबद्दल भाष्य केले होते. त्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला आहे.

 

चंद्रकांत पाटील यांनी एक पोस्ट ट्विट करत मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन पंतप्रधानांना भेटण्याचा सल्ला दिला आहे. “टीम इंडिया असं समजून काम करा उद्धवजी… आताही वेळ आहे. आरे कारशेडच्या प्रश्नांवर उद्धवजी यांच्या वक्तव्याचे भारतीय जनता पार्टी स्वागत करेत. पण मी राज्य सरकारला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, या प्रकल्पाचे ८० टक्के काम आमच्या सरकारच्या कार्यकाळात झाले आहे. तुम्ही सुरूवातीपासूनच याला इगोचा विषय बनविला, जर तुमच्या उपाययोजना वेगळ्या आणि मुंबईच्या हितासाठी असत्या आणि त्यासाठी तुम्हाला केंद्राची जागा हवी होती, तर तुम्ही मुख्यमंत्री या नात्याने पंतप्रधानांकडे निवेदन दिले असते. तुमच्याकडे प्रारंभी वेळ होता की, तुम्ही देवेंद्रजींना सोबत घेऊन सर्व तज्ज्ञांच्या अहवालाचा अभ्यास करून निर्णय घेऊ शकला असता. पण आजही मेट्रो कारशेडवर तुमचे सर्व निवेदन अपूर्ण आहे. ते जनतेला भ्रमात पाडणारे आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन मोदीजी आणि केंद्राच्या इतर विभागातील मंत्र्यांची भेट घेऊन तोडगा काढून मुंबईच्या हिताचा निर्णय घेऊ शकता. एक जनप्रतिनिधी आणि सर्वप्रथम महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून हाच माझा तुम्हाला सल्ला आहे,” असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केले आहे.


 

मेट्रो कारशेडचा मुद्दा आता बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे येऊन थांबला आहे. कांजूरमार्गच्या केंद्राच्या मालकीच्या जागेवरून न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढल्यामुळे आता हा प्रकल्प बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे हलविण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढवली आहे. यावरूनच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!