सोलापूर, वृत्तसंस्था
आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. माढा, सांगोला व सोलापूर शहर मध्य या तीन मतदारसंघातून पहिल्यांदाच विधानसभा लढलेल्या तिघांनाही मतदारांनी पसंती दाखविली आहे. माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजीत पाटील, सांगोल्यातून ‘शेकाप’चे बाबासाहेब देशमुख व सोलापूर शहर मध्य या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे हे पहिल्यांदाच विधानसभेत प्रवेश करतील. तिघेही तरुण चेहरे असून त्यांच्याकडून मतदारांना खूप आशा आहेत. याशिवाय मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजू खरे यांनीही पहिल्याच निवडणुकीत विजय मिळविला आहे.
मोहोळचा बालेकिल्ला शरद पवार माजी आमदार राजन पाटील, विद्यमान आमदार यशवंत माने यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. तर उत्तमराव जानकर यांनी भाजपचे विद्यमान आमदार राम सातपुते यांनाही पराभवाचा धक्का दिला आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात सध्या भाजपला चार (शहर उत्तर, शहर मध्य, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला चार (माढा, करमाळा, माळशिरस, मोहोळ) आणि सांगोल्याची जागा शेकापला मिळाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी पाचव्यांदा विजय मिळविला आहे. त्यांना ही निवडणूक कठीण जाईल, असा भल्याभल्यांचा अंदाज चुकला असून त्यांनी जवळपास ४० हजारांहून अधिक मतांनी आघाडी घेतली आहे. तर दक्षिण सोलापूरमधून विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांनी हॅट्रिक साधली आहे. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दुसऱ्यांदा तर नगरसेवक ते थेट विधानसभा लढलेले देवेंद्र कोठे पहिल्याच निवडणुकीत आमदार झाले आहेत.
माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे उमेदवार अभिजीत पाटील, सोलापूर शहर मध्यमधील भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे आणि सांगोल्यातील शेकापचे बाबासाहेब देशमुख पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. विशेष बाब म्हणजचे अभिजीत पाटील व देवेंद्र कोठे हे पहिल्याच विधानसभेच्या निवडणुकीत आमदार झाले आहेत. मोहोळचे राजू खरे यांनीही पहिल्याच निवडणुकीत यश मिळविले आहे. माळशिरसमधून उत्तमराव जानकर हेही पहिल्यांदाच विधानसभेत प्रवेश करतील. या निवडणुकीत नारायण पाटील यांनी करमाळ्यात विद्यमान अपक्ष आमदार संजय शिंदे यांना तर माढ्यात तुतारीचे अभिजित पाटील यांनी विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांचा पराभव केला आहे.