ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटच्या जनतेने विकास कामांना दिला कौल

म्हेत्रे आणि पाटलांच्या राजकीय विश्वाला मोठा हादरा

अक्कलकोट, वृत्तसंस्था

 

निवडणूक काळात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केलेला नियोजनबद्ध प्रचार,लाडकी बहीण योजनेचा परिणाम, मागच्या पाच वर्षात भाजपने  केलेली विकास कामे लक्षात घेता पुन्हा एकदा कल्याणशेट्टी यांच्यावर तालुक्यातील जनतेने विश्वास दाखवला आहे. विरोधकांनी केलेल्या अपप्रचारला जनतेने कुठेही थारा दिला नाही. हा निकाल काँग्रेससाठी चिंतनाचा विषय  ठरला असून या निकालामध्ये अण्णा आणि आप्पांच्या राजकीय विश्वाला मोठा हादरा बसला आहे.दोन ज्येष्ठ नेते एकीकडे असतानाही युवा नेते सचिन कल्याणशेट्टी  यांनी दिलेली टक्कर ही लक्षवेधी ठरली आहे. हा पराभव सिद्धाराम म्हेत्रे यांच्या जिव्हारी लागला आहे. तडवळ भागात काँग्रेसला खूप मोठ्या मताधिक्याची अपेक्षा होती पण माजी आमदार पाटील यांच्या भागातच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अकरा हजाराचे मताधिक्य घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे.हा पाटील गटासाठी देखील चिंतनाचा विषय झाला आहे.आमदार कल्याणशेट्टी यांनी सुरुवातीपासूनच या निवडणुकीसाठी मायक्रो प्लॅनिंग आणि मायक्रो स्कॅनिंग अशा दोन्ही पद्धतीची प्रचार यंत्रणा मतदारसंघात लावली होती आणि ती यशस्वी ठरली आहे असे म्हणावे लागेल.

 

महायुती सरकारने काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजना सुरू  केली होती. या योजनेचे जवळपास ९० हजार लाभार्थी तालुक्यामध्ये होते. त्याचा इम्पॅक्ट देखील या निवडणुकीवर झाला. त्याशिवाय आमदार कल्याणशेट्टी यांनी आपल्या अडीच वर्षाच्या महायुती सरकारच्या काळात उजनीचे पाणी, श्री मल्लिकार्जुन मंदिराचा जीर्णोद्धार, नवीन बस स्टॅन्ड , न्यायालयाची इमारत, दुय्यम निबंधक कार्यालय, पोलीस स्टेशनची इमारत यासारख्या अनेक विकास कामांना मंजुरी घेतली आहे. त्यापैकी अनेक विकास कामे ही सध्या सुरू आहेत. सुरू असलेल्या कामांचाही मतदारांवर मोठा परिणाम झाला, अशी चर्चा आहे. या निवडणुकीत जनतेने विकास कामांना कौल दिला हे स्पष्ट आहे. त्याशिवाय मतदार संघाशी जोडलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याशी आमदार कल्याणशेट्टी यांनी संपर्क साधला होता. परिवारातील एक ना एक व्यक्ती त्यांच्या संपर्कात होता. त्याचाही परिणाम जनतेवर झाल्याचे दिसून आले. वागदरी मतदार संघामध्ये आनंद तानवडे हे ऐन वेळी आमदार कल्याणशेट्टी यांच्याबरोबर आले. ती जमेची बाजू राहिली. लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा, दलित, मुस्लिम आणि धनगर समाजाचा मोठा परिणाम झाला होता. ही मते विरोधात गेली होती. पण यावेळी तसा काय प्रकार दिसून आला नाही.बऱ्यापैकी मते हे महायुतीच्या बाजूने वळल्याचे चित्र दिसून आले.

 

लोकसभा निवडणुकीत महाविकास  आघाडीने जो नरेटीव सेट केला होता. तो नरेटिव्ह या निवडणुकीमध्ये चालला नाही, हे निकालावरून स्पष्टपणे दिसून येते. त्याशिवाय आमदार कल्याणशेट्टी यांनी निवडणुकीच्या आधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणून विकास कामाचा शुभारंभ करत प्रचाराची जोरदार सुरुवात केली होती. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, आमदार पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जाहीर सभा घेऊन वातावरणाला चांगली गती दिली होती. प्रचाराच्या यंत्रणेमध्ये कल्याणशेट्टी हे कुठेही कमी पडताना दिसले नाहीत. परगावच्या मतदारांना आणण्याचे त्यांचे नियोजन परफेक्ट होते. परगावच्या मतदारांचाही कौल आमदार कल्याणशेट्टी यांच्या बाजूने दिसून आला. त्यामुळे मताधिक्यात मोठी वाढ झाली. काँग्रेसच्या दृष्टीने विचार केल्यास परगावचे मतदार आणण्यामध्ये विस्कळीतपणा  दिसून आला.

 

काँग्रेसमध्ये ज्येष्ठ आणि  युवा कार्यकर्त्यांमध्ये प्रचारामध्ये समन्वय दिसून आला नाही आहे त्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये  नाराजी असल्याची चर्चा निकालानंतर सुरू होती. निवडणुकीमध्ये ऐनवेळी माजी आमदार सिद्रामप्पा पाटील हे म्हेत्रे यांच्याबरोबर आल्याने तडवळ भागातील मूळ काँग्रेसचा गट हा भाजपच्या बरोबर

गेला. त्यामुळे तडवळ भागात काँग्रेसला मोठा फटका बसल्याची चर्चा आहे. तडवळ भागात मूळ भाजपचे कार्यकर्ते हे भाजप बरोबर राहिले आणि पाटील गट काँग्रेस बरोबर गेल्याने काँग्रेसचे जुने कार्यकर्ते भाजपला येऊन मिळाले. त्या ठिकाणी फार विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती. काँग्रेसला बोरामणी, कुंभारी, वळसंग या तीन मतदारसंघात काँग्रेसला खूप अपेक्षा होती परंतु सुरुवातीलाच या ठिकाणी १५ हजारच्या आसपास मताधिक्य मिळाल्याने काँग्रेसची विजयाची आशा येथूनच संपुष्टात आली. दुधनी भाग वगळता काँग्रेसला कुठेही स्पेस मिळाली नाही चपळगाव गटामध्ये गेल्या वेळी लोकसभेला काँग्रेसने मुसंडी मारली होती. यावेळी स्थानिक उमेदवार म्हणून त्या ठिकाणच्या मतदारांनी पुन्हा एकदा आमदार कल्याणशेट्टी यांच्यावर विश्वास दाखवत या गटात भाजपने मुसंडी मारली आहे. या गटामध्ये काँग्रेसने मोठी फिल्डिंग लावली होती पण ती जादू चालली नाही.

 

आमदार कल्याणशेट्टी यांच्या हन्नूर गावामध्ये भाजपने काँग्रेसला जोरदार धक्का देत १ हजार मतांची आघाडी मिळवली. अक्कलकोट शहर हा भाजपचा बालेकिल्ला आहे. लोकसभेला याठिकाणी केवळ चारशे मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे या ठिकाणच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या ठिकाणी लिंगायत समाजाचे मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. या मतदारांनी ३ हजार पेक्षा अधिक मताधिक्य देऊन भाजपला मोठे बळ दिले आहे. या ठिकाणी काँग्रेसला हार मानावी लागली आहे. एकूण निकालावर जर नजर टाकली तर बाराव्या फेरीमध्ये काँग्रेसला केवळ ३६५ मतांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर  २४ व्या आणि २५ व्या फेरीतच आघाडी मिळाली. एकूण २५ फेऱ्यांचा विचार केला तर केवळ तीनच फेऱ्यांमध्ये काँग्रेसला किरकोळ मताधिक्य मिळाले. बाकी २२ फेऱ्यांमध्ये भाजपने एकतर्फी मताधिक्य मिळवत विजयाची सलामी दिली आणि काँग्रेसचा दारुण पराभव केला. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि माजी आमदार सिद्रामप्पा पाटील या दोघांनी मिळून कल्याणशेट्टी यांच्या विरोधात ताकद लावली होती. पण लागलेल्या निकालातुन या दोघांना भावी राजकारणाच्यादृष्टीने धोक्याची घंटा दिली आहे.

 

विरोधकांच्या प्रचाराला  थारा नाही

 

निवडणुकीमध्ये आमदार कल्याणशेट्टी यांच्यावर विरोधकांकडून खूप टोकाला जाऊन आरोप केले होते.परंतु या निवडणुकीत आमदार कल्याणशेट्टी यांना मिळालेले मताधिक्य पाहता या गोष्टींना बिलकुल थारा मिळाला नाही. जनतेने एक प्रकारे सकारात्मक,विकासात्मक राजकारणाला चालना दिल्याचे निकालावरून स्पष्ट दिसून येते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!