मुंबई वृत्तसंस्था
महायुतीला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जनतेने कौल दिले. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही सर्वात मोठी गेमचेंजर ठरली. या योजनेअंतर्गंत पात्र महिलांना दरमहा 1 हजार 500 रुपये देण्यात आले. यामुळे महायुतीला लाडक्या बहिणींनी भरघोस मतदान केले. महायुतीने दिलेल्या आश्वासनानुसार, आता लाडक्या बहिणींना दर महिन्याला 2 हजार 100 रुपये मिळणार आहेत. मात्र आता निकालानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निकषात मोठे बदल केले जाणार असल्याचे बोललं जात आहे. आता यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
लाडकी बहीण योजनेवरुन आता तुमचे डोळे उघडले आहेत. या योजनेचा बोजा सरकारच्या तिजोरीवर पडतोय, त्यामुळे ती योजना बंद करायला हवी. आता त्यांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. कोणतीही शाहनिशा न करता सरसकट १५०० रुपयांचा जो व्यवहार केला त्यावर अनेकांचा आक्षेप होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही निकष बदला असे सांगितले आहे. याआधी निकष न बदलता तीन ते चार महिन्याचे पैसे देण्यात आले कारण १५०० रुपयाला लाडक्या बहिणींची मतं विकत घेण्याचा प्रयत्न झाला. ती लाच होती. तेव्हा त्यांना निकष, नियम, कागदपत्रं या संदर्भात भान राहिलं नाही. फक्त त्यांना मत विकत घ्यायची होती, असे संजय राऊत म्हणाले.
“राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या आता असं लक्षात आलं की अनेक कमावत्या महिला, कामधंदा करणाऱ्या मुंबईतील महिला ज्यांचं उत्पन्न खूप छान, उत्तम आहे जे मोठमोठ्या कार्यालयात काम करतात, अशा घरातल्या तीन तीन महिलांनाही लाडकी बहिण योजनेचे पैसे जातात. ही गरीब महिलांसाठी, सामान्य महिलांसाठी योजना आहे. ज्यांचं उत्पन्नाचे साधन नाही, अशा ग्रामीण भागातील, शहरातील महिलांसाठी ही योजना असावी अशी आमची भूमिका होती. पण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्यामुळे काही लाख महिला आता त्यांच्यासमोर आल्या आहेत”, असेही संजय राऊतांनी म्हटले.
“हे पैसे तुम्ही चुकीच्या मार्गाने दिलेत आणि आता तुमचे डोळे उघडलेत की या योजनेचा बोजा सरकारच्या तिजोरीवर पडतोय, त्यामुळे ती योजना बंद करायला हवी. आता त्यांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. उत्पन्नाचे साधन काय, पैसे कुठून आणणार, हे आता नवीन सरकारच्या लक्षात आलं आहे. आता आमची एवढीच प्रार्थना आहे की ज्या महिलांना पैसे दिलेत ते काढून घेऊ नका. त्यांना नोटीस पाठवून पैसे जमा करा, असे सांगू नका. तुम्ही काहीही करु शकता. हे जे काही सुरु आहे, त्यावर आमचं बारीक लक्ष आहे”, असेही संजय राऊत म्हणाले.