नितेश तिवारी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रामायण’ या चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चा आहे. यात अभिनेता रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत्तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांना पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या भूमिकांसाठी ते दोघेही बरीच मेहनत घेत आहेत. मात्र अलीकडे या चित्रपटातील भूमिकेसाठी साई पल्लवीने नॉनव्हेज सोडलं असं सांगण्यात आलं होतं. आता या चर्चांवर स्वतः अभिनेत्रीने मौन सोडलं आहे. तिने एक पोस्ट करत स्वतः खरं सांगितलंय.
साई पल्लवीने ट्वीटरवर एक पोस्ट करत लिहिलं, ‘बऱ्याचदा खरं तर नेहमीच मी शांत राहते. जेव्हा अनेक अफवा, खोट्या गोष्टी कोणत्याही उद्दिष्टाशिवाय पसरवल्या जातात. पण, आता सारख्या सारख्या या गोष्टी पसरवल्या जात असल्याने शांत राहून चालणार नाही. खास करून, जेव्हा माझा सिनेमा प्रदर्शित होणार असेल किंवा नव्या सिनेमाची घोषणा होत असेल, तेव्हाच या गोष्टी होतात. पुन्हा कोणत्याही मीडिया पेजवरुन किंवा व्यक्तीने अशाप्रकारे अफवा पसरवण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाईने उत्तर दिलं जाईल.’
साई पल्लवीने एका तामिळ वेबसाइटचा फोटो शेअर करत हे ट्विट केलं आहे. ज्यात तिने भूमिकेसाठी मांसाहार सोडल्याचं बोललं गेलंय. मात्र महत्वाची गोष्ट अशी की साई पल्लवी ही आधीपासूनच शाकाहारी आहे. ती मांसाहार करत नाही. तिने या बद्दल एका मुलाखतीत सांगितलं होतं. मात्र तरीही या सगळ्या खोट्या बातम्या पसरवल्या गेल्याने ती आता भडकली आहे.
साई पल्लवीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं. तिच्या नो मेकअप पॉलिसीने सगळ्याची मनं जिंकली. ‘मारी’, ‘श्याम सिंघा रॉय, ‘गारगी’, ‘फिदा’ सारख्या चित्रपटांमध्ये तिचा अभिनय वाखाणण्याजोगा होता. त्यातून ती घराघरात पोहोचली. आता ती लवकरच ‘रामायण’ मधून बॉलिवूड प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.