ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजप – शरद पवार गटाच्या नेत्याची अदानींच्या घरी बैठक

मोठा राजकीय भूकंप होणार ?

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था 

 

महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींना दिल्लीत वेग आला आहे. शरद पवार यांच्या पक्षातील एका बड्या नेत्याची भाजपच्या केंद्रीय मंत्र्यासोबतची बैठक उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झाल्याची माहिती मिळाली आहे.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाल्यांनतर शरद पवार यांच्या पक्षातील आमदार आणि खासदारांमध्ये हालचाली वाढल्या आहेत. दिल्लीत 4 डिसेंबरला शरद पवारांच्या खासदारांची एक बैठक झाली. या बैठकीत आपण सत्तेत गेलो पाहिजे, असा सूर खासदार आणि आमदारांचा होता. पण, यावरून दोन गट पडल्याचं सांगितलं जात आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं आपलं स्वतंत्र अस्तित्व ठेऊन भाजपसोबत सत्तेत सामील व्हावे, असं एका गटाचं मत आहे. तर, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सामील व्हावे, असा मुद्दा दुसऱ्या गटानं लावून धरला आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि खासदारांची इच्छा सत्तेत सामील होण्याची आहे. त्यासह भाजपच्या केंद्रीय मंत्र्यानं शरद पवार यांच्या नेत्याकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आगामी काळातील भूमिकेबद्दलही माहिती घेतल्याचं सांगितलं जात आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार हे महायुतीच्या संपर्कात आहेत, असं भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांनी बुधवारी सांगितलं. काही दिवसांपूर्वी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता.

 

संजय राऊत काय म्हणाले?

याबाबत खासदार संजय राऊत म्हणाले की, प्रफुल्ल पटेल आणि अजितदादांना शरद पवार यांचे 5 खासदार फोडा मग तुम्हाला केंद्रात मंत्रिपद देऊ, अशी ऑफर दिली आहे. पण, शरद पवार यांनी कष्टाने खासदार निवडून आणले. हे त्यांचा पक्ष फोडत आहेत. फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. खासदारांनी अजितदादांसोबत जाणे किंवा भाजपसोबत जाणे, ही एकच गोष्ट आहे. मी शरद पवार यांना ओळखतो. पुरागामी, धर्मांद आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांपासून शरद पवार कधीही दूर जाणार नाहीत. भाजपच्या गोटात सामील झालेले हौशे-नौशे आणि जे घाबरून पळून गेले आहेत, त्यांच्या नादी लागून शरद पवार वेगळा विचार करणार नाहीत.

या सगळ्यांसाठी गौतम अदानी मध्यस्थी करत आहेत. गौतम अदानींच्या घरी राजकीय चर्चा होतात. ते महाराष्ट्राचं राजकीय भविष्य ठरविण्याचा प्रयत्न करत आहेत. गौतम अदानींनी विमानतळ, धारावीची जमीन गिळली. हे अदानी आता महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय भविष्य ठरविणार आहेत. गौतम अदानी विनोबा भावे, यशवंतराव चव्हाण, दादा धर्माधिकारी, जमनलाल बजाज आहेत का?. गौतम अदानी राजकारणांच्या गटात-तटात मध्यस्थ होऊन महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. नरेंद्र मोदींचे मित्र असलेले अदानी महाराष्ट्र आणि देश लुटण्याचा प्रयत्न करत असल्यानं गोंधळ सुरू आहे. आता अदानी महाराष्ट्रात राजकारण करणार का? जे अदानींच्या घरी मुंड्या खाली घालून बसत आहेत, त्यांना मराठी माणूस म्हणून घ्यायला लाज वाटती पाहिजे,” अशी संतप्त प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!