बीड, वृत्तसंस्था
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे सोमवारी (दि. ९) अपहरण करुन खुन करण्यात आला. या प्रकरणात सात आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयितांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटेचाही समावेश आहे. दरम्यान शनिवारी (ता. १४) संभाजीराजे छत्रपती व पॅंथर सेनेचे दिपक केदार यांनी मस्साजोगला भेट देऊन देशमुख कुटूंबियांचे सांत्वन केले.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चिंतन करावे. माजी मंत्री लक्ष घालावे. ते आराेपींना हजर का करत नाहीत, असा सवाल करत अजितदादा हे लोक तुमच्याच पक्षाचे आहेत. तुम्ही नेहमी शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेता तर संतोष देशमुख यांच्या कुटूंबियांना न्याय द्या. येथे भेट देऊन भावना समजून घ्या, असा संताप संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला.
यानंतर माध्यमांशी संवाद साधताना संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला. घटना घडल्यानंतर केज पोलिसांनी तीन तास मजा घेतल्याचा आरोप करत केजचे पोलिस निरीक्षकांना सहआरोपी करण्याची मागणीही त्यांनी केली. याबाबत आपण विशेष पोलिस महानिरीक्षक मिश्र यांना विचारले तर त्यांनाही काही सांगता आले नाही.
शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात इतकी क्रुर हत्या होऊ शकते, यावर विश्वास बसत नाही. आपण शिवरायांचे वंशज आहोत. शिवरायांनी सर्व जाती धर्मांतील लोकांना सोबत घेतले. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे अथवा उद्रेक झाला तर आपण जबाबदार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. संतोष देशमुख यांनीही सर्व समाजासाठी काम केले.
दलित लोकांवरील अन्यायाच्या विरोधातच तो लढल्याने त्याचा खुन झाला. या प्रकरणाला जातीय रंग नको असे सांगून या प्रकरणाचा तपास सीआयडी ऐवजी एसआयटी नेमणूक करावा, बाहेरचा अधिकारी असावा अशी मागणीही त्यांनी केली. जिल्ह्यातील आमदारांनी अधिवेशनात हा मुद्दा लावून धरावा असे आवाहन करत या प्रकरणाचा तपास होईपर्यंत संबंधीत नेत्याला अजित पवारांनी मंत्रीपद देऊ नये असेही ते म्हणाले.