नवी दिल्ली वृत्तसंस्था
प्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झाले. झाकीर हुसैम हे अनेक दिवसांपासून आरोग्यासंबंधीत विविध समस्यांनी त्रस्त होते. पण रविवारी 15 डिसेंबर रोजी त्यांची प्रकृती खालावली आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उस्ताद झाकीर हुसेन यांच्यावर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे उपचार सुरू होते. रविवारी त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र रविवारी संध्याकाळी झाकीर हुसैन यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
समोर आलेल्या माहितीनुसार झाकीर हुसैन यांचे जवळचे मित्र राकेश चौरसिया यांनी रविवारी सांगितले की झाकीर हुसैन यांनी उच्च रक्तदाब सारख्या समस्या होत्या. त्याचप्रमाणे त्यांना हृदयाशी संबंधित आजार होते. त्यांना सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी कथक नृत्यांगना अँटोनिया मिनेकोला, मुली अनीसा कुरेशी आणि इसाबेला कुरेशी, भाऊ तौफिक कुरेशी, फजल कुरेशी आणि जगभरात विखुरलेला शिष्य परिवार आहे.
उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी मुंबईत झाला. झाकीर हुसेन यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील माहीम येथील सेंट मायकल स्कूलमधून झाले. याशिवाय त्यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले. त्यांचे वडील उस्ताद अल्ला रक्खा खाँ यांच्याकडेच त्यांनी वयाच्या चौथ्या वर्षापासून तबल्याचे धडे गिरवले. त्यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिल्यांदा जाहीर वादन केले.
संगीत क्षेत्रात रचले अनेक इतिहास
– कौशल्यपूर्ण वादनाने आणि बुद्धिमत्तेमुळे ते भारतीय शास्त्रीय संगीतातल्या वादकांसाठी एक ‘सर्जनशील’ साथीदार होते. याबरोबरच झाकीर यांनी जाझ आणि जागतिक संगीतातही आपला ठसा उमटवला. त्यांनी अनेक प्रसिद्ध वादकांसोबत जगभरात कार्यक्रम केले तसेच एकलवादनही केले.
– जॉन मॅकलॉघ्लिन, एल. शंकर आणि टी.एच. विनयक्रम यांच्याबरोबर त्यांनी ‘शक्ती बँड’ स्थापन करून संगीत क्षेत्रात इतिहास रचला. त्यांनी जगविख्यात दिग्दर्शकांच्या चित्रपटांसाठी पार्श्वसंगीत दिलं, तसंच काही चित्रपटांत अभिनयही केला.
– उस्ताद झाकीर हुसेन यांना १९८८मध्ये पद्मश्री, २००२ मध्ये पद्मभूषण आणि २०२३ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. झाकीर हुसेन यांना तीन ग्रॅमी पुरस्कारही मिळाले होते.