सोलापूर वृत्तसंस्था
ऊस गाळपाने आता चांगलाच वेग घेतला असून कालपर्यंत राज्यात १८३ साखर कारखाने सुरू झाले आहेत. ऊस गाळपात सध्या तरी सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम असला तरी पुणे व कोल्हापूर जिल्ह्यात ऊस गाळपाचा वेग कमालीचा वाढला आहे. मागील वर्षी जिल्ह्यात व राज्यात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे उसाचे क्षेत्र कमालीचे घटले आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर प्रादेशिक साखर विभागातील सोलापूर व धाराशिव जिल्ह्यात पाणीटंचाईचा मोठा फटका बसला होता.
ऊस क्षेत्र कमी असल्याने यंदा गाळपही कमी होणार आहे. शासनाने १५ नोव्हेंबरपासून साखर हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र २० नोव्हेंबर रोजी मतदान २३ रोजी मतमोजणी होईपर्यंत बहुतेक साखर कारखाने सुरू झाले नव्हते. मतमोजणीनंतरच बहुतेक साखर कारखाने सुरू झाले. उशिराने सुरू झालेल्या साखर कारखान्यांच्या गाळपाने आता चांगलाच वेग घेतला आहे. राज्यातील सहकारी ९३ व खासगी ९० अशा १८३ साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे.
ऊस गाळपात राज्यात आतापर्यंत सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. सोलापूर जिल्ह्याचे ऊस गाळप राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आज जरी अधिक असले तरी पुणे व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा वेग कमालीचा वाढला आहे. त्यामुळे यंदा ऊस गाळपात कोल्हापूर व पुणे जिल्हे सोलापूरला ऊस गाळपात मागे टाकण्याची शक्यता आहे.
२८ कारखाने अन् ३० लाख गाळप
१) सोलापूर जिल्ह्यात सध्या २८ साखर कारखाने सुरू झाल्याची नोंद प्रादेशिक कार्यालयात झाली आहे. २८ साखर कारखान्यांनी ३० लाख २३ हजार मेट्रिक टन ऊस गाळप केले आहे.
२) राज्यात १८३ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला असला तरी कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांतील साखर कारखान्यांची प्रति दिन ऊस गाळप क्षमता अधिक असल्याचे दिसत आहे.
३) शिवाय पुरेसे ऊस क्षेत्र व ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा पुरेशी असल्याने कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील ऊस गाळप अधिक होताना दिसत आहे.
४) पुणे जिल्ह्यात १४ साखर कारखान्यांनी २८ लाख ५५ हजार मेट्रिक टन तर कोल्हापूर जिल्ह्यातील २३ कारखान्यांचे २७ लाख ८५ हजार मेट्रिक टन गाळप झाले आहे.
राज्यातील १९१ साखर कारखान्यांना गाळप परवाने
– राज्यातील १९१ साखर कारखान्यांना आतापर्यंत ऊस गाळप परवाने दिले असून आणखीन १६-१७ अर्ज शासकीय देणी दिली नसल्याने व इतर कारणावरून पेंडिंग आहेत.
– ज्या साखर कारखान्यांचे क्लिअर होईल त्यांनाही परवाने दिले जातील. यंदा २०० च्या दरम्यान साखर कारखाने सुरू होण्याचा अंदाज आहे.
– सोलापूर जिल्ह्यात मागील तीन-चार वर्षात ३४ साखर कारखाने हंगाम घेत होते. यंदा ही संख्या कमी होईल असे दिसत असल्याची माहिती साखर आयुक्त कार्यालय, पुणे यांनी दिली.