मुंबई वृत्तसंस्था
प्रसिद्ध दिग्दर्शक पद्मश्री श्माम बेनेगल यांचं निधन झालं आहे. तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारा दिग्गज दिग्दर्शक म्हणून श्याम बेनेगल यांची ओळख होती. त्यांनी चित्रपटांमधून मांडलेली कथा, मुद्दे हे खरंच विचार करायला लावणारे आणि सुन्न करणारे असायचे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘अंकुर’ चित्रपटाची तर संपूर्ण जगाला दखल घ्यावी लागली होती. सामाजिक मुद्द्यांवर चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे भाष्य करणाऱ्या कलाकाराचे आज निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 90 वर्षी अखेरचा श्वास घेतला.
विशेष म्हणजे बेनेगल यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांचा 90 वा वाढदिवस साजरा केला होता. श्याम बेनेगल हे भारतीय चित्रपटसृष्टीतील खूप मोठी हस्ती होती. भारतीय चित्रपटसृष्टीत समांतर चित्रपटांची चळवळ सुरु करणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. त्यांच्या निधनामुळे सामाजिक बांधलकी जपत चित्रपट निर्माण करणाऱ्या या चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
श्याम बेनेगल गेल्या काही महिन्यांपासून आजारपणाशी सामना करत होते. बेनेगल यांच्या दोन्ही किडन्या दोन वर्षांपासून निकामी झाल्या होत्या. त्यांची आज प्राणज्योत मालवली आहे. श्याम बेनेगल यांच्या निधनामुळे बॉलिवूडमधील एका मोठ्या पर्वाचा अंत झाला आहे. ते 90 वर्षांचे होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध चित्रपटांचं दिग्ददर्शन केलं होतं. श्याम बेनेगल यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं होतं. त्यांना 2013 सालचा कलामहर्षी बाबूराव पेंटर जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. तसेच त्यांना पद्मश्री पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार अशा पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आलं होतं. त्यांना 2018 सालचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं.
श्याम बेनेगल यांनी 1974 मध्ये ‘अंकुर’ चित्रपटापासून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं होतं. हा चित्रपट सामाजिक मुद्द्यांवर आधारित होता. त्यांचा हा पहिलाच चित्रपट इतका यशस्वी झाला की, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या चित्रपटाची दखल घेतली गेली होती. तसेच त्यांनी ‘निशांत’, ‘भूमिका’, ‘मंथन’, ‘जुबैदा’ आणि ‘सरदारी बेगम’ अशा अजरामर चित्रपटांची निर्मिती केली. हे चित्रपट इतके नामांकीत झाले होते की श्याम बेनेगल हे नाव त्या काळात घराघरात पोहोचले होते. विशेष म्हणजे ‘मंथन’ हा असा चित्रपट होता की, बेनेगल यांनी प्रेक्षकांच्या आर्थिक मदतीने बनवली होती. हा चित्रपट डेअरी आंदोलनाशी संबंधित होता. त्यांच्या चित्रपटांची विशेषत: ही होती की ते सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यातील संघर्षावर भाष्य करणाऱ्या गोष्टींवर आधारित चित्रपट करायचे.