पुणे, वृत्तसंस्था
महाराष्ट्रात विविध भागांमध्ये काही प्रमाणात आभाळी हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे वेधशाळाने पुढील दोन-तीन दिवस राज्यातील अनेक जिह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस येणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. तेव्हा हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवावे आणि त्यानुसार नियोजन करावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये थंडीचा गारवा पाहायला मिळतोय. असे असतानाही मध्येमध्ये वातावरणात बदल होत असल्याचे दिसते आहे. अशातच पुणे वेधशाळाने २६ डिसेंबर आणि २७ डिसेंबर या दोन दिवसात राज्यात पावसाची स्थिती होऊ शकते असा अंदाज वर्तवला आहे. तेव्हा अवकाळी पावसापासून पिकांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.
पुणे वेधशाळेचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील दक्षिणेकडील तुरळक भाग; २७ डिसेंबर रोजी नाशिक विभागातील खानदेश, पुणे विभागातील (मध्य महाराष्ट्र), उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय २८ डिसेंबरला खानदेश, मराठवाडा (त्यातही उत्तरेकडील जिल्हे) आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघ गर्जनेसह पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते.
महाराष्ट्रातील पावसाच्या स्थितीव्यतिरिक्त मुंबईतील प्रदूषणाबाबतही होसाळीकर यांनी माहिती दिली. मुंबईतील हवामानात होणारे बदल, प्रदूषणात होणारी सततची वाढ यामुळे मुंबईत काही दिवस सकाळी आणि संध्याकाळी प्रदूषण पातळी वाढणार असल्याची शक्यता आहे असे त्यांनी म्हटले आहे.