धाराशिव, वृत्तसंस्था
बीडच्या केज तालुक्यात मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं आधी अपहरण केलं. त्यानंतर अतिशय निर्घृणपणे त्यांची हत्या केली. त्याआधी पुण्यात विधान परिषदेचे भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची देखील अपहरण करुन निर्घृण हत्या करण्यात आली. कल्याणमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते हेमंत परांजपे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. तर दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटना एकापोठापाठ घडताना दिसत आहेत. गुन्हेगारांची हिंमत वाढताना दिसत आहे. कारण या घटनांमुळे पोलिसांचे भय न राहिल्याने आता गुन्हेगारांनी मोठमोठ्या नेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना टार्गेट करायला सुरुवात केल्याचं दिसत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या 2 पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. तुमचादेखील संतोष देशमुख करु, अशी धमकी हल्लोखारांनी पत्रातून दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
आमदार तानाजी सावंत यांच्या 2 पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. तुमचाही संतोष देशमुख केला जाईल, अशी धमकी पत्रातून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबाराची घटना घडली होती. अज्ञात व्यक्तींकडून ही धमकी देण्यात आली आहे. तुमचा संतोष देशमुख मस्साजोग करु, असं अज्ञातांनी शंभरच्या नोटेसह धमकीचं पत्र दिलं आहे. या धमकीनंतर धनंजय सावंत आणि केशव सावंत यांनी ढोकी पोलीस ठाण्यात तक्रार केली.
विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीआधी धनंजय सावंत यांच्या घरावर गोळीबार झाला होता. धनंजय सावंत हे धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत. धनंजय सावंतांचा सोनारी येथे भैरवनाथ साखर कारखाना आहे. केशव सावंत हे तेरणा कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत. कारखान्याकडे जाणारा ट्रॅक्टर अडवत अज्ञात दोघांनी चालकाला बंद पाकिट दिलं. त्या बंद पाकिटात जीवे मारण्याचे धमकीचे पत्र होते.
धमकी आणि गोळीबार प्रकरणी तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी पोलीस विभागावर गंभीर आरोप केले आहेत. आमच्या जीवाला धोका निर्माण झाल्यावरच पोलीस डिपार्टमेंट याचा शोध घेणार का? असा सवाल धनंजय सावंत यांनी धाराशिव पोलिसांना केला आहे. या प्रकरणी धनंजय सावंत थेट राज्याच्या गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार आहेत. दरम्यान, माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरावर काही दिवसापूर्वी करण्यात आलेला गोळीबार आणि आता देण्यात आलेली धमकी या प्रकरणी धाराशिव जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना देण्यात आलेल्या धमकी प्रकरणी धाराशिव जिल्ह्यात त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ उद्या तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातील भूम शहर बंद ठेवण्याचा इशारा सावंत समर्थकांनी दिला आहे. या घटनेचा तपास लवकर व्हावा यासाठी धाराशिवमध्ये शिवसेनेकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले आहे