ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मनोज जरांगे पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये

संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची घेणार भेट

जालना वृत्तसंस्था 

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली.  संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेलं नाहीये, त्यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी राज्यभरातून होत आहे. दरम्यान उद्या पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.  कुणाचा बापही आला तरी देखील संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण दबू देणार नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. दुसरीकडे ते परभणीमध्ये जाऊन सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबाची देखील भेट घेणार आहेत.

मनोज जरांगे पाटील उद्या 12 वाजता परभणीला जाऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांचा आज रात्रीचा मुक्काम परभणी जिल्ह्यामधील पूर्णा तालुक्यातील दामपुरी येथे असणार आहे. त्यानंतर ते उद्या सकाळी 9 वाजता आलेगाव आणि त्यानंतर दुपारी 12 वाजता परभणी येथे जाणार आहेत. ते तिथे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.

दरम्यान उद्या दुपारनंतर मनोज जरांगे पाटील हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, ते संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. कुणाचा बापही आला तरी देखील संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण दबू देणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.   28 तारखेला बीड येथे होणाऱ्या मोर्चामध्ये संपूर्ण बीड जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहनही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. या मोर्चात स्वत: मनोज जरांगे पाटील देखील सहभागी होणार आहेत. दरम्यान यापूर्वी देखील एकदा मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली आहे, त्यावेळी देखील त्यांनी पोलीस यंत्रणांना इशारा दिला होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!