पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे शहरानजीक असलेले कोरेगाव भीमा येथे आज 207 वा शौर्यदिन साजरा केला जात असून कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायींनी गर्दी केली आहे. त्यासोबतच या ऐतिहासिक विजय स्तंभाला आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली आहे. पुण्यातील कोरेगाव भीमा या ठिकाणी शौर्य दिनानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. कोरेगाव भीमा या ठिकाणी 5 हजार पोलीस सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आले आहेत.
कोरेगाव भीमा येथे 207 व्या शौर्यदिनी ऐतिहासिक विजयस्तंभ शौर्यदिन कार्यक्रमानिमित्त प्रशासनाकडून नियोजनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावर्षी भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या धर्तीवर ऐतिहासिक विजयस्तंभास फुलांची सजावट करण्यात आली आहे. त्यासाठी ७० हजार कृत्रिम आणि १ हजार किलो खऱ्या फुलांचा वापर करण्यात आला आहे. कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास शौर्यदिनी होणाऱ्या मानवंदना कार्यक्रमादरम्यान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात येते. तब्बल वीस गुंठे जागेमध्ये असलेला ७५ फुटी ऐतिहासिक विजयीस्तंभ यावर्षी कृत्रिम व खऱ्या फुलांनी सजविण्यात आला आहे. या स्तंभावर फुलांनी अशोकचक्र, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आणि संविधानाचे तैलचित्र लक्ष वेधून घेत आहे .
कोरेगाव भीमा या ठिकाणी पाच हजार पोलीस कर्मचारी, सातशे पन्नास पोलिस आधिकारी तैनात करण्यात आले आहेत.
यासोबतच एक हजार होमगार्ड आणि आठ कंपन्या काम करत आहेत. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 50 पोलिस टॉवर, 10 ड्रोन आणि चोरी रोखण्यासाठी विशेष पोलिस पथक आहे, अशी माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. यावेळी शांतता राखण्यासाठी 31 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारची दंगल होऊ नये यासाठी सोशल मीडियावरही निर्बंध घालण्यात आले आहे. काही आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी जाहीर केले आहे.