बीड : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील बीड येथील खून प्रकरण चर्चेत येत असतांना बीडच्या मस्साजोग हत्याकांडाशी निगडीत खंडणी प्रकरणात पोलिसांना हवा असणारा वाल्मीक कराड मंगळवारी सीआयडीला शरण आला. त्यानंतर आता त्याची बीड शहर पोलिस ठाण्यातील एका बंद खोलीत कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीमुळे प्रकृती बिघडल्यामुळे रात्री त्याच्यावर ऑक्सिजन लावण्याची वेळ आल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे तपास अधिकारी त्याची प्रकृती सांभाळून आपला तपास करत आहेत.
वाल्मीक कराड मंगळवारी पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला. त्यानंतर त्याला रस्तेमार्गाने बीडच्या केज येथे आणण्यात आले तिथे कोर्टापुढे हजर केल्यानंतर त्याच्या चौकशीला सुरुवात झाली. आज त्याच्या चौकशीचा पहिला दिवस आहे. बीड शहर पोलिस ठाण्यातील एका बंद खोलीत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सीआयडीचे अधिकारी त्याची चौकशी करत आहेत. सीआयडीने या प्रकरणी आरोपी सुदर्शन घुले याच्या 2 भावांनाही चौकशीसाठी बोलावले आहे.
सीआयडीचे अधिकारी मंगळवारी रात्री 9.30 च्या सुमारास वाल्मीक कराडला घेऊन बीडच्या केजला पोहोचले. त्यानंतर 11.30 च्या सुमारास त्याला केज स्थित न्यायालयापुढे हजर करण्यात आले. यावेळी न्यायाधीशांनी त्याला पोलिसांविरोधात काही तक्रार आहे का? असा प्रश्न केला. त्यावर त्याने नाही असे प्रत्युत्तर दिले. त्यानंतर मध्यरात्री 1.30 च्या सुमारास त्याला बीड शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तिथे पुन्हा त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी त्याने आपल्याला श्वसनाचा त्रास होत असल्याची तक्रार केली. यामुळे त्याला तात्पुरते ऑक्सिजन लावण्यात आले. रक्तातील साखर वाढल्यामुळे त्याच्यावर ही वेळ आल्याचा दावा केला जात आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, वाल्मीक कराड बुधवारी सकाळी 8.30 च्या सुमारास झोपेतून उठला. त्यानंतर त्याने नाश्ता करणे टाळले. सकाळी साडेअकराच्या दरम्यान त्याने अर्धी-एक चपाती घेतली त्यानंतर पुन्हा त्याच्या चौकशीस सुरूवात झाली.