नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घराजवळ एकाने अल्पवयीन मुलीला फूस लावून त्याच्या भाच्यासोबत पळून जाण्यास मदत केल्याच्या संशयावरून एकाने त्या शेजारच्यावर कुऱ्हाडीने वार करत त्याचे शिरच धडापासून वेगळे केले. इतकेच नव्हे तर ते शिर हातात घेऊन ३०० मीटर चालत जात तो पोलिस चौकीत पोहोचला व खुनाची कबुलीही दिली. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भरदिवसा सकाळी अकराच्या सुमारास दिंडोरी तालुक्यातील ननाशी येथे घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान, मृताच्या नातलगांनी तब्बल सहा तास पोलिस चौकीवरच ठिय्या दिल्याने तणाव निर्माण झाला होता.
मिळालेली अमाहितीनुसार, गुलाब रामचंद्र वाघमारे (३८) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून संशयित आरोपी सुरेश बोके याला अटक करण्यात आली आहे. पेठ तालुका पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेठ ननाशी ग्रामस्थ हा रक्तरंजित प्रकार बघून सैरभर पळत असतानाच बोके सिनेस्टाइल करत मृत वाघमारेचे मुंडके व कुऱ्हाड हातात घेत पोलिस ठाण्यात पोहोचला. तेथे पोलिसांसमोर आक्रोश करत मीच याचे मुंडके कापले… तुमच्यासमोर आणले… मला पकडा, असे म्हणाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलाब वाघमारे यांच्यासोबत सुरेश बोके (४१) व त्यांचा मुलगा विशाल यांचा जनावरे विक्रीच्या व्यवसायातून अधूनमधून वाद होत होता. बुधवारी (१ जानेवारी) सकाळी ९ वाजेच्या सुमारास पुन्हा बोके पितापुत्रांचा वाघमारे यांच्याशी वाद झाला. शेजारच्या मंडळींनी मध्यस्थी करत तो मिटवला. संशयित सुरेशला आपल्या अल्पवयीन मुलीला वाघमारे यानेच फूस लावून वाडीव-हे येथे राहणाऱ्या त्याच्या भाच्यासोबत पळवून लावल्याचा संशय होता. काही वेळातच डोक्यात राग धरून बसलेल्या सुरेशने गुलाब वाघमारे हा घरापासून काही अंतरावर बाहेर एकटा जात असल्याचे बघताच पाठीमागून त्याच्या अंगावर कुऱ्हाडीने वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे बघून पुन्हा त्याच्या अंगावर वार करीत शिर कुऱ्हाडीने धडावेगळे करत स्वतःच मोठमोठ्याने आरडाओरड केली. सुरेशचा रुद्रावतार बघून ग्रामस्थांनीही पुढे जाण्याची हिंमत केली नाही. वाघमारे यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, पत्नी, मूकबधिर भाऊ व भावजयी असा परिवार आहे. गावात तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या सूचनेनुसार अपर अधीक्षक अनिकेत भारती, उपअधीक्षक देसाई, खेडकर हे मोठा फौजफाटा घेत ननाशी येथे दाखल झाले. आरोपीला ताब्यात द्या, त्याची मुंडीच छाटतो संशयितास आमच्या हवाली द्या, त्याची मुंडी छाटतो, अशी मागणी मृताच्या नातलगांनी पोलिसांसमोर करत आंदोलन केले. अखेरीस पोलिस अधिकाऱ्यांनी सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांच्या मदतीने मृताच्या नातेवाइकांची समजूत काढल्यानंतर तणाव मिटला. त्यानंतर आरोपीला पेठ पोलिस ठाण्यात नेण्यात आले.