ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजपचा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का

पुणे वृत्तसंस्था 

पुण्यात भाजपने शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे, ठाकरे गटाच्या पाच माजी नगरसेवकांनी शिवबंधन सोडत कमळ हाती घेतलं आहे. आधीच ताकद कमी असलेल्या पुणे शहरात शिवसेना ठाकरे गटाची ताकद आणखी कमी झाली आहे. या धक्क्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे गटासमोर मोठं आव्हान असणार आहे.

पुण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे विशाल धनवडे, बाळा ओसवाल, प्राची आल्हाट, संगीता ठोसर आणि पल्लवी जावळे या माजी नगरसेवकांनी आज चंद्रशेखर बावनकुळे, मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. भाजपात पक्षप्रवेश करत असताना माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी पक्ष नेतृत्वासह स्थानिक नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.

तर दुसरीकडे आगामी महापालिका निवडणूकीच्या तोंडावर भाजपची आधीच पुण्यात ताकद असताना आणखी ताकद वाढली आहे. पुणे महापालिकेत एकहाती सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहे, याचाच हा एक भाग असल्याचं बोललं जात आहे. मात्र या पाच माजी नगरसेवकांनी पक्षात प्रवेश केल्यामुळे भाजपमधील अंतर्गत नाराजी वाढल्याचं देखील बोललं जात आहे. त्यामुळे या पक्षप्रवेशामुळे भाजपला महापालिका निवडणुकीत फायदा होणार की फटका बसणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

पुणे शहरात ठाकरे गटाचे एकूण 10 नगरसेवक होते, दोन गट पडल्यानंतर नगरसेवक नाना भानगिरे हे शिंदे गटात गेले आणि आता पाच नगरसेवक भाजपात गेल्यामुळे केवळ चार नगरसेवक ठाकरे गटासोबत आहेत, यामुळे पुण्यात ठाकरे गटाची ताकद निश्चितच कमी झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पक्षनेतृत्वाला विचार करावा लागणार आहे.

 

महापालिका निवडणुकीपूर्वी धक्का 

शिवसेना ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. महापालिका निवडणुकांची घोषणा येत्या काळात होऊ शकते, मात्र त्यापूर्वीच पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  त्यामुळे आता पुण्यात शिवसेना ठाकरे गटाची ताकद कमी झाली असून, याचा फायदा भाजपला होऊ शकतो.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!