सोलापूर वृत्तसंस्था
ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त नंदीध्वजांची मिरवणूक काढली जाते. यात्रेसाठी चार ते पाच लाख भाविक येतात. त्यामुळे वाहतुकीचा अडथळा होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर १२ ते १६ जानेवारीपर्यंत शहरातील सहा मार्गांवरील वाहतुकीत बदल करून त्या मार्गांवरील वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी त्यासंबंधीचे आदेश काढले आहेत.
यात्रेच्या निमित्ताने विजापूर वेस ते पंचकट्टा, लक्ष्मी मार्केट ते पंचकट्टा, भारतीय स्टेट बॅंक ट्रेझरी शाखा (पूजा ऑफिस स्टेशनरी दुकान) ते पंचकट्टा, भारतीय स्टेट बॅंक ट्रेझरी शाखा ते पंचकट्टा, पार्क चौक ते मार्केट चौकी आणि ज्ञानप्रबोधिनी प्रशाला ते डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह हे मार्ग १२ ते १६ जानेवारीपर्यंत सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत. त्या वाहनांसाठी विजापूर वेस ते बेगमपेठ पोलिस चौकीमागून मार्ग उपलब्ध असणार आहे.
पूनम चौक- रंगभवन चौक- सात रस्ता- जुना एम्प्लॉयमेंट चौक- डफरीन चौक ते पार्क चौक असा मार्ग देखील त्या मार्गांवरील वाहनांसाठी उपलब्ध असणार आहे. दुसरीकडे, श्री सिद्धरामेश्वर मंदिर, श्री मल्लिकार्जुन मंदिर, संमती कट्टा परिसर व होम मैदान या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होतात. श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी असते. या पार्श्वभूमीवर हा सर्व परिसर ‘नो पार्किंग झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे.
१२ ते १६ जानेवारी या काळात शहरातील विविध मार्गांवरून नंदीध्वज मिरवणूक काढली जाते. हिरेहब्बू मठ, बाबा कादरी मशीद, डॉ. चिडगुपकर यांचे घर, श्री. केळकर वकिलांचे घर, दाते यांचे श्री गणपती मंदिर, हाजीमाई चौक, खाटीक मशीद, कसबा चौक, माणिक चौक, विजापूर वेस, वडतिले यांचे दुकान, घिसाड गल्ली, पंचकट्टा, रिपन हॉल व तेथून श्री सिद्धरामेश्वर मंदिर (संमती कट्टा), डफरीन चौक, रेल्वे स्टेशन, भय्या चौक, नवीवेस पोलिस चौकी, छत्रपती शिवाजी महाराज चौक एसटी स्टँड, सम्राट चौक, बाळीवेस, चाटी गल्लीपर्यंत तसेच नंदीध्वज ६८ लिंग प्रदक्षिणा मार्ग या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना नंदीध्वज मिरवणुकीवेळी प्रवेशबंदी असणार आहे.