मुंबई, वृत्तसंस्था
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबईतील विविध समस्या आणि मतदारसंघातील प्रश्नासंदर्भात ही भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निशाणा साधला आहे. सरडा रंग बदलतो पण अशा प्रकारची नवीन जात मी पहिल्यांदा बघितली, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी टोला लगावला आहे.
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोनवेळा भेट घेतली होती. ही त्यांची तिसरी भेट होती याविषयी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, घटनाबाह्य सरकार, घटनाबाह्य मुख्यमंत्री, ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजींना फडतूस म्हणणारे, एक तर तू तरी राहशील नाही तर मी तरी राहील अशी टोकाची भाषा यांनी वापरली. टोकाची टीका करणारे एवढ्या लवकर रंग बदलतील असं वाटलं नव्हतं. सरडा रंग बदलतो पण अशा प्रकारची नवीन जातं मी पहिल्यांदा बघितली. लोकांनी ज्यांना झिडकारलं, लोकांच्या, बाळासाहेबांच्या, हिंदुत्वाच्या विचारांची प्रतारणा केली त्यांना जनतेने जागा दाखवून दिली. मतदारांनी त्यांचा कचरा केला.
शिवसेनेत होणाऱ्या पक्षप्रवेशावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून अनेक पक्षातील पदाधिकारी शिवसेनेत दाखल झाले. विधानसभा निवडणुका महाविकासआघाडी जिंकणार आणि मंत्रिमंडळ देखील त्यांनी जाहीर केलं होते. मोठं फाईव्ह स्टार हॉटेल बुकिंग केले होते. परंतु महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीच्या अडीच वर्षाच्या कामावर विश्वास ठेवून त्यांच्या सर्व फाईव्ह स्टार हॉटेल्सची बुकिंग रद्द करुन टाकली. विधानसभा तो अभी झाकी हे, महापालिका अभी बाकी है,ये तो ट्रेलर हे, पिच्चर अभी बाकी है…
ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांची, हिंदूत्वाच्या विचारांशी प्रतारणा केली. स्वतःच्या स्वार्थासाठी बाळासाहेब आणि हिंदूत्वाचे विचार सोडले त्या लोकांना विधानसभेत धडा शिकवला . येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये खऱ्या अर्थाने मोठं यश महायुतीला मिळेल आणि म्हणून म्हणून मोठ्या विश्वासाने लोक आमच्याकडे येत आहेत. ते आधी म्हणतं होते आमच्याकडे एकही पदाधिकारी राहणार नाही आणि जे गेले ते कचरा… आता उद्या महाराष्ट्रातून ओघ आमच्याडे येतोय त्याला देखील कचराच बोलतील परंतु त्यांना आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.