पुणे : वृत्तसंस्था
राज्यात महायुतीचे सरकार आले असून मुख्यमंत्रीपदी देवेद्र फडणवीस यांनी कार्यभार घेतला आहे तर नुकतेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका कार्यक्रमात मुलाखत देताना अनेक विषयांवर भाष्य केले. लोकसभा निवडणुकीत आम्ही ओव्हर कॉन्फिडंसमध्ये होतो आणि महाविकास आघाडी देखील होती. मात्र विधानसभा निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीचा फेक नरेटीव्हचा फुगा एका मिनिटांत फोडला आणि पूर्ण महाविकास आघाडी धुवून काढली, असा टोला फडणवीस यांनी यावेळी बोलताना लगावला. तसेच शरद पवारांनी संघाचे कौतुक केले त्यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही ठरवले होते की सगळ्या चर्चा करून सरकार तयार करू. त्यामुळे जरा कालावधी लागला. यात कधी एकनाथ शिंदे नाराज, कधी अजित पवार नाराज. आता माध्यमांना देखील दोष देता येत नाही, त्यामुळे बातमी मिळाली तर ठीक नाहीतर काहीतरी बनवावी लागते. कधी कधी आम्ही लोक बातम्या तयार करतो. पण मला असे वाटत नाही की त्यात फार काही अटी शर्ती टाकल्या आणि शिंदे साहेबांनी ते तात्काळ स्वीकारले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिंदे साहेबांच्या समोर तोच प्रश्न होता की मुख्यमंत्री होतो आणि आता उपमुख्यमंत्री व्हावे की नाही. त्यामुळे मी त्यांना माझा अनुभव सांगितला, मी म्हंटले की तुम्हाला पक्ष चालवायचा आहे. माझा पक्ष तर असा आहे की अनेक नेते आहेत, दिल्लीत वरिष्ठ आहेत. पण तुमचा पक्ष हा तुमच्या एका खांबावर उभा आहे. विभाजन झाल्यानंतर चांगले यश मिळालेला तुमचा पक्ष आहे त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये आले पाहिजे. आता तुम्ही माझे चेहऱ्यावर नेहमी हास्य पाहिले असेल, पण त्यांचा चेहरा असा आहे की त्यांच्या चेहऱ्यावर फारसे हास्य नसते. पण ते मुख्यमंत्री असताना देखील त्यांचा तसा चेहरा होता पण तेव्हा कोणी बोलले नाही. आणि आता उपमुख्यमंत्री झाल्यावर बघा शिंदे साहेब हसतच नाहीत, असा एक समज तयार झाला.
महाराष्ट्रात आपण पाहिले आहे की एक संस्कृती आहे. दक्षिणेत पाहिले तर तिथे दोन पक्षाचे नेते एकमेकांशी बोलत नाहीत. तसे इथे नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर माझे पहिल्याच भाषणात सांगितले की मला महाराष्ट्राची राजकीय परंपरा परत आणायची आहे. मला बदल घडवणारे राजकारण करायचे आहे बदला घेण्याचे नाही. मला असे वाटते की त्याला प्रतिसाद सगळ्याच नेत्यांनी दिला. त्यामुळे सगळ्या पक्षाचे नेते एकमेकांना भेटत आहेत.