मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यातील खुनाची देशभर चर्चा झाली असून या देशमुख हत्या प्रकरणावरून अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोपांची राळ उठली असून, पवनचक्की कंपनीकडून खंडणी वसूल करण्याचे प्रकरण मुंडे यांना भोवण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन भाजपचे केंद्रीय नेतृत्व मुंडे यांच्यावर कारवाई करण्यास राजी झाले आहे.
गुजरातमधील एका पवनचक्की कंपनीकडून मुंडे आणि वाल्मीक कराड यांनी बंगल्यावर बोलवत त्यांना धमक्या दिल्या व खंडणी वसूल केल्याच्या प्रकरणामुळे मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, मुंडेंचा राजीनामा मागितला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांवर मुंडे यांना स्पष्टीकरण देता आलेले नाही. या आरोपांमधील तथ्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या निदर्शनाला आले आहे.
फडणवीस यांनी, कोणताही नेता एखाद्या प्रकरणात अडकला तर माफी नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. मात्र, मुंडे हे अजित पवार गटाचे असल्याने निर्णय अजित पवार घेतील. भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि फडणवीस यांनी मुंडे यांना बाजूला करण्याचा सल्ला अजित पवारांना दिला आहे. अजित पवार आणि त्यांच्या गटातील आमदार हे मुंडे यांना बाजूला करा, या मताचे आहेत. तरीही निर्णय का होत नाही, असा अजित पवार आणि भाजपच्या आमदारांचा सवाल आहे.