ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोदी जनतेशी करत आहे गुलाबी स्वप्नांचा ‘व्यापार’ : ठाकरेंचा सरकारवर निशाणा !

मुंबई : वृत्तसंस्था

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यातील महायुतीमधील मंत्री व आमदारांची भेट घेणार आहे तत्पूर्वी ठाकरे गटाच्या सामना वृत्तपत्रात आलेल्या अग्रलेखाची चर्चा जोरदार सुरु झाली आहे. शेअर बाजार आणि रुपयाच्या मूल्यात ऐतिहासिक घसरण होत आहे. परकीय गुंतवणुकीला ओहोटी लागली आहे. परकीय गंगाजळीने दहा महिन्यांतील नीचांक गाठला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतील भडका महागाई वाढवणार आहे. देशाचे वास्तव हे असे भीषण आहे आणि तिकडे पंतप्रधान मोदी भारत पूर्णपणे गरिबीमुक्त झालेला दिवस आता दूर नाही, असे छातीठोकपणे सांगत आहेत. वास्तव अत्यंत विपरीत असले तरी मोदी जनतेशी गुलाबी स्वप्नांचा ‘व्यापार’ करीत आहेत. कारण त्यात ते वाकबगार आहेत! अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. दैनिक सामनाच्या माध्यमातून ठाकरे गटाने महागाईच्या मुद्यावरुन सरकारवर निशाणा साधला आहे.

दैनिक सामना मधील अग्रलेख देखील वाचा….
देशाच्या शेअर बाजारापासून रुपयापर्यंत सर्वत्र घसरगुंडी सुरू आहे. परकीय गंगाजळी आणि परकीय गुंतवणुकीला ओहोटी लागली आहे. तरीही पंतप्रधान मोदी देशाच्या अर्थव्यवस्थेचे गुलाबी चित्र लोकांसमोर रंगवीत आहेत. जगातील कोणतीच शक्ती आता भारताला विकसित होण्यापासून रोखू शकत नाही, असे त्यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले. प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे? अर्थव्यवस्थेचे वास्तव काय आहे? वस्तुस्थिती ही आहे की, मोदींचे फुगे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी हवेतच पह्डत आहेत. मंगळवारी भारताचा शेअर बाजार प्रचंड गडगडला. मुळात मागील काही दिवसांपासूनच शेअर बाजारात घसरण सुरू आहे. रोज या घसरणीचा वेग वाढत आहे. मंगळवारी थेट हजारावर अंशांनी सेन्सेक्सने गटांगळी खाल्ली. निफ्टीनेदेखील घसरण नोंदवली. देशाच्या भांडवली बाजारातील या घडामोडींमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे 25 लाख कोटींचे नुकसान झाले. त्यातही सर्वाधिक फटका बसला छोटय़ा गुंतवणूकदारांना आणि याच वर्गाला आपले पंतप्रधान ‘विकसित’ भारताचे स्वप्न विकत आहेत.

सेन्सेक्सप्रमाणेच रुपयाचीही घसरगुंडी थांबायला तयार नाही. मंगळवारी रुपयानेही दोन वर्षांतील विक्रमी नीचांक गाठला. ऐतिहासिक घसरण नोंदविली. जागतिक अर्थकारणात सध्या ज्या घडामोडी होत आहेत, त्याचा विपरीत परिणाम भारतीय शेअर बाजारावर आणि रुपयाच्या मूल्यावर असा दोन्ही पद्धतीने होत आहे. अमेरिकेत येणारे नवे सरकार, त्याच्या आर्थिक धोरणांची अनिश्चितता, तेथील रिझर्व्ह पॉलिसी रेट कमी वेळा कपात करण्याचा अंदाज या गोष्टींचाही परिणाम भारताच्या अर्थकारणावर होत आहे. केंद्रातील राज्यकर्ते काहीही सांगत असले तरी भारतासह जगभरातील परकीय गुंतवणुकीचा ओघ कमी होत असून तो अमेरिकेच्या दिशेने वाढत आहे ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणारच, असे पंतप्रधान मोदी कोणत्या आधारावर सांगत आहेत? पुन्हा आता जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींचाही भडका उडाला आहे. त्यामुळे देशातील पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढणार हे निश्चित आहे. ही दरवाढ आधीच भडकलेल्या महागाईच्या वणव्यात तेल ओतणार आहे. त्यात सामान्य जनताच होरपळणार आहे. तरीही आपले पंतप्रधान भारत खूप वेगाने प्रगती करीत असल्याच्या बाता मारीत आहेत.

बेरोजगारीमध्ये वाढ आणि रोजगारनिर्मितीमध्ये घट अशी देशातील स्थिती असली तरी गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने 25 कोटी लोकांना रोजगार दिला व अनेकांना गरिबीतून बाहेर काढले, अशी वल्गना पंतप्रधान मोदी करीत आहेत. मागील काही काळापासून शेअर बाजार आणि रुपयाच्या मूल्यात ऐतिहासिक घसरण होत आहे. देशातील परकीय गुंतवणुकीला ओहोटी लागली आहे. परकीय गंगाजळीने दहा महिन्यांतील नीचांक गाठला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतील भडका महागाई वाढवणार आहे आणि सामान्य भारतीयांचीच अवस्था बिकट करणार आहे. देशाचे वास्तव हे असे भीषण आहे आणि तिकडे पंतप्रधान मोदी देशाच्या अर्थव्यवस्थेचे गुलाबी फुगे हवेत सोडत आहेत. भारत पूर्णपणे गरिबीमुक्त झालेला दिवस आता दूर नाही, असे छातीठोकपणे सांगत आहेत. वास्तव अत्यंत विपरीत असले तरी मोदी जनतेशी गुलाबी स्वप्नांचा ‘व्यापार’ करीत आहेत. कारण त्यात ते वाकबगार आहेत!

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!