बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून आता या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड याचा संबंध असल्याने अनेक राजकीय आरोप – प्रत्यारोप होत आहेत. या हत्या प्रकरणानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस बीडची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. हा धनंजय मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता ही मोठी घडामोड घडली आहे. या हत्याकांड प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याच्यामुळे राष्ट्रवादीची जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली. विष्णू चाटे हा केजचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष होता, मात्र या गुन्ह्यात त्याचे नाव आल्यानंतर त्याला तातडीने निलंबित केले होते. यानंतर आता संपूर्ण जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अनेक लोकांची चौकशी सुद्धा झाली, त्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर सुनील तटकरे यांनी हा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली. जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांची निवड होईपर्यंत जिल्हाध्यक्ष म्हणून राजेश्वर चव्हाण हेच काम पाहतील असे पक्षाकडून कळवण्यात आले आहे. तसेच यापुढे तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका कराव्या अशा सूचना प्रदेशाध्यक्षांकडून बीड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देण्यात आल्या आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पक्षातील नेत्यांवर मोठ्या प्रमाणावर आरोप झाले होते, त्याचबरोबर मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर वाल्मिक कराडशी असलेला संबंध आणि इतर घडामोडींच्या पार्श्वभूमीनंतर आता पक्षाकडून मोठी खबरदारी घेतली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने घेतलेल्या निर्णयावरून आता गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले किंवा कोणत्याही गुन्ह्याच्या घटनेत सहभागी झालेले लोक असतील त्यांना पदापासून दूर ठेवले जाईल, अशी मानसिकता पक्षाची दिसून येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे.