पुणे : वृत्तसंस्था
देशभरातील अनेक शेतकरी विविध प्रयोग करून लाखो रुपये कमवीत असल्याच्या घटना उजेडात येत आहे तर त्यांच्या सक्सेस स्टोरीज विविध माध्यमांवर वाचायला मिळतात. अशीच एक प्रेरणादायी सक्सेस स्टोरी आहे दौंड येथील जोडप्याची. प्रशांत आणि प्रिया जगताप या जोडप्याने एका एकर जमीनीवर जांभळ्या वांग्याची लागवड करून तब्बल ८ लाख रुपये कमावले आहेत. यासाठी २ लाख खर्च केले होते.
जांभळी वांगी ही खायला अत्यंत चवदार असतात. त्यांच्या वांग्यांना पुण्यातील हॅाटेल्समध्ये मोठी मागणी आहे. ते आपल्या शेतातली वांगी येथे पुरवतात. या वांग्यांची किंमत १५ ते २५ रुपये प्रतिकिलो आहे. यामुळे या वाग्यांची मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे. खरंतर दौंड तालुका हा ऊसाची लागवड करण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे मोठ्या प्रमाणवार शेतकरी ऊसाची लागवड करतात आणि त्यातून नफा कमवतात. पण या जोडप्याने पारंपारिक शेतीला फाटा देत एक अनोखा प्रयोग केला आहे. त्यांच्या या अनोख्या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या जोडप्याने १९ एकर शेतात ऊसासोबतच पालेभाज्या आणि फळांची देखील लागवड केलेली आहे. योग्य व्यवस्थापन, सिंचनाची सोय केल्याने या शेतकरी जोडप्याला चांगलं उत्पन्न मिळत आहे. १ डिसेंबरपासून वांग्याच्या कापणीला सुरूवात झाली. दर तीन दिवसांनी सरासरी दीड ते दोन टन उत्पादन मिळत आहे. या वांग्याचे वजन ३०० ते ४०० ग्रॅम आहे. या जोडप्याने शेतीमध्ये केलेल्या अनोख्या प्रयोगामुळे त्यांचे कौतुक तर होतच आहे शिवाय शेतीमधून नवा प्रयोग करून उत्पन्न घेता येते, ही संकल्पना त्यांनी रुढ केली आहे.