वटवृक्ष स्वामी मंदिरातील स्वामींचे दर्शन पुन्हा बंद ; प्रशासनाच्या आदेशानंतर मंदिर समितीने घेतला निर्णय
अक्कलकोट,दि.२५ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्यांची स्थिती पाहता प्रशासनाकडून वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यामुळे २५ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ते २ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत अक्कलकोटचे वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात येत असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी दिली.येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात प्रतिवर्षी २५ डिसेंबर ते २ जानेवारी अखेर नाताळ सुट्टया, दत्त जयंती व नुतन वर्षानिमीत्त दरवर्षी प्रमाणे यंदाही स्वामी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.यातच २५ डिसेंबर रोजी यंदा नाताळ सणाची सुट्टी, शनिवार दि. २६ व रविवार दि. २७ डिसेंबर रोजी सलग शासकीय सुट्टया आहेत. मंगळवार दि. २९ रोजी श्री दत्त जयंती आहे. गुरूवार दि. ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षास निरोप व शुक्रवार दि. १ जानेवारी रोजी नुतन वर्षाची सुरूवात इत्यादी सलग गर्दीचे दिवस लक्षात घेवून कोरोना संसर्गाचा फैलाव होवू नये म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.यासंदर्भात भाविकांना अक्कलकोट शहरात प्रवेश मनाई करण्याचे लेखी पत्राद्वारे आदेश दिले आहेत. त्यानुसार २५ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ते दिनांक २ जानेवारीच्या मध्यरात्री पर्यंत वटवृक्ष मंदीर पुन्हा एकदा बंद करण्यात आले असल्याची माहिती इंगळे यांनी दिली. या कालावधीत कोणत्याही स्वामी भक्तांनी स्वामी दर्शनाकरीता मंदीराकडे येण्याचे टाळावे व स्वामी भक्तांनी आपल्या घरीच थांबून स्वामींची आराधना करावी,असे आवाहन इंगळे यांनी स्वामी भक्तांना केले आहे.