मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर नसून खून झाला आहे. असा जो निष्कर्ष न्यायालयाने काढला आणि पाच पोलिसांवर गुन्हे दाखल केले, याला जबाबदार कोण? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. तत्कालिन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परवानगी शिवाय हा खून झाला का? असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्या निर्णयाचे राऊत यांनी स्वागत केले.
या संदर्भात संजय राऊत म्हणाले की, लैंगिक अत्याचार करणाऱ्याला कठोर शिक्षा व्हायलाच हवी. पश्चिम बंगालमधील आरोपींना ताबडतोब जन्मठेप झाली. त्याला आता फाशीची शिक्षा व्हावी म्हणून ममता बॅनर्जींचे सरकार हे वरच्या न्यायालयात जात आहे. या संदर्भात देखील असे करता आले असते. फास्टट्रॅक कोर्टात प्रकरण चालवून या आरोपीला देखील कठोर शिक्षा देणे सहज शक्य होते. मात्र, त्या आरोपीचे खोटे एन्काऊंटर केले गेले. विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला सहानुभूती मिळावी म्हणून एन्काऊंटर केले गेले. त्यामुळे पाच पोलिस फासावर जाण्याचे काम झाले. या संदर्भात तेव्हाचे गृहमंत्री यांनी भूमिका स्पष्ट करायला हवी, यासंदर्भात तुम्ही अंधारात होता का? या पाच पोलिसांनी वरिष्ठांच्या परवानगीशिवाय हे हत्याकांड केले का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
जर गृहमंत्री अंधारात असतील तर त्यावेळेसचे पोलिस आयुक्त कोण आहेत? त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली. तत्कालिन राज्याचे मुख्यमंत्री तेच त्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांच्या परवानगी वरून हे हत्याकांड झाले का? असा प्रश्न देखील राऊत यांनी उपस्थित केला. असे झाले असेल तर त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. त्याच भागात विशाल गवळी नावाच्या गुन्हेगाराने लैंगिक शोषण करून खून केला. त्याचा एन्काऊंटर का केला नाही? असा प्रश्न देखील राऊत यांनी उपस्थित केला. निवडणुका झाल्यानंतर हा प्रकार समोर आल्यामुळे त्याचे एन्काऊंटर केले गेले नसल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांचेही एन्काउंटर का केले नाही? असा प्रश्न देखील राऊत यांनी उपस्थित केला. त्यामुळे अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्याला तोच न्याय दिला गेला पाहिजे, असे देखील राऊत म्हणाले.