अक्कलकोट : मारुती बावडे
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा गोकुळ परिवाराचे संस्थापक श्री बलभीम भाऊ शिंदे यांचे वयाच्या ७५ वर्षी दुःखद निधन झाले. काल रात्री त्यांची तब्येत अचानकच बिघडली. त्यानंतर सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पहाटे साडेसहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या पश्चात पत्नी शोभा, गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता आणि मॅनेजिंग डायरेक्टर कपिल अशी दोन मुले,नीता एक मुलगी आणि सुना असा परिवार आहे. त्यांच्यावर आज दुपारी ४ वाजता मूळ गावी म्हणजे दहिटणे (तालुका अक्कलकोट) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.तत्पूर्वी त्यांचे पार्थिव दहिटणे येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. बलभीम भाऊ शिंदे एक आदर्श सुसंस्कृत, तत्त्वनिष्ठ,राजकारणी होते. राजकारण किंवा समाजकारण करताना
त्यांनी तत्त्वाशी कधीही तडजोड केली नाही.दहिटणे गावचे माजी सरपंच होते.
१९९७ ते २००२ दरम्यान चपळगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते विक्रमी मतांनी निवडून आले होते.२००३ साली ते भाजप जिल्हाध्यक्ष होते.तो काळ अतिशय संघर्षाचा होता.त्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये भाजप वाढविण्यास त्यांनी मोठा हातभार लावला. भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे,स्व.प्रतापसिंह मोहिते – पाटील व संपूर्ण मोहिते – पाटील परिवारासोबत त्यांचे चांगले संबंध होते.जेष्ठ नेते स्व.पंचप्पा कल्याणशेट्टी सर,स्वर्गीय आमदार बाबासाहेब तानवडे, दत्ता अण्णा तानवडे,गुरुसिद्धप्पा प्रचंडे यांच्यासोबत अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते.माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्याबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध होते.२००२ ते २००७ मध्ये किणी गणाचे पंचायत समिती सदस्य होते.२००३ ते २००७ साली अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते.१९९२ मध्ये स्वामी समर्थ कारखान्याचे संचालक होते.या सर्व त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये कधीही त्यांनी स्वतःला डाग लागू दिला नाही.दहिटणेसारख्या छोट्या गावात १ जुन १९५० रोजी बलभीम भाऊ शिंदे यांचा जन्म झाला.वडिल स्व.दत्तात्रय शिंदे व आई अंजनाबाईंच्या यांच्या संस्कारात बलभीम शिंदेंचे आयुष्य सुरू झाले.
संपूर्ण शिंदे कुटूंबाचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून होता.त्यातच वडिलांचे छत्र लहानपणीच हरवल्याने संपूर्ण कुटूंबाची जबाबदारी बलभीम भाऊ व बंधु स्व.भगवान शिंदेसह इतर दोन भावंडांवर पडली.ज्या वयात हसणे,खेळणे आणि शिक्षण घेणे ठरलेले असते.त्या वयात संपूर्ण कुटूंबाची जबाबदारी चारही भावंडांवर पडली.समाजात वावरत असताना ज्या अडचणी बलभीम शिंदेंना लहानपणी दिसल्या.त्यानंतर त्यांच्या मनात समाजकारणाची भावना जन्मास आली. आणि यातुन बलभीमभाऊ शिंदेंसारख्या कार्यकर्तृत्वाचा नेतृत्वाचा उदय तालूक्यात झाला.बलभीमभाऊ शिंदे यांनी आपल्या आयुष्यात राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त प्राधान्य दिले. तशी शिकवण त्यांनी आपल्या परिवाराला देखील दिली. समाजकारणातून जी माणसे आपण कमावतो त्यातून राजकारण यशस्वी करता येते हे त्यांनी दाखवून दिले. आज भाजप पक्षाचा जो विस्तार जिल्ह्यामध्ये झाला आहे त्याचा पाया खऱ्या अर्थाने बलभीम शिंदे यांनी त्या काळात रचला होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
हे करत असताना त्यांनी फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे संचालक म्हणूनही त्यांनी चांगले काम केले.
ज्यावेळी चपळगाव परिसरात दुष्काळ पडला.त्या त्या वेळी बलभीम शिंदे व संपूर्ण शिंदे कुटूंबांनी स्वतःच्या शेतातील पिके वाळवून पाणीपूरवठा केल्याची घटना जनता कधीच विसरणार नाही.विशेष म्हणजे अक्कलकोट तालूक्यातील ऊस उत्पादकांची अडचण दूर करण्यासाठी त्यांनी कारखानदारीक्षेत्रातही मोठे काम केले. बलभीम भाऊ ,स्व.भगवान भाऊंनी माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या खांद्याला खांदा लावून शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी रूद्देवाडीच्या माळरानावर मातोश्री शुगर्सची स्थापना केली.यानंतर शिंदे परिवाराची वाटचाल कधीच थांबली नाही.तडवळ व धोत्री या ठिकाणी साखर कारखान्याची निर्मिती करून संपूर्ण अक्कलकोट तालूक्यातील शेतकऱ्यांसाठी ऊसाचा प्रश्न मिटवला.शेतकरी जगला तरच देशात लोकशाही नांदेल या तत्त्वाने जगणारे बलभीम भाऊ होते.दहिटणेसारख्या छोट्याशा गावात जन्मलेले भाऊ स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चटणी,भाकरी अनेकदा आनंदाने खायचे.आधूनिक शेती व तंत्रज्ञान फार गरजेची आहे,असा सल्ला ते नेहमी दयायचे.त्यांनी श्रीमंतीचा देखावा कधी केला नाही.स्वतःच्या कारखान्यात तालूक्यातील अनेक गरीब कुटूंबातील बेरोजगारांना कामावर घेतले.त्यांच्याकडे गेलेल्या प्रत्येक गरजूला ते सढळ हाताने मदत करायचे.भाऊंनी संपूर्ण आयुष्यभर समाजकारण केले.आज त्यांच्या विचारांचा वारसा त्यांचे पुत्र तथा गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे,कपिल शिंदे हे निरंतरपणे चालवत आहेत.समाजकारण व सहकार क्षेत्रातील एक निष्ठावंत हरपल्याची भावना खासदार शरदचंद्र पवार ,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.आमदार सचिन कल्याणशेट्टी,माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्यासह इतर मान्यवरांनी बलभीम भाऊंच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.