मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. धनंजय मुंडे हे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी आढळले आहेत. करूणा शर्मांनी लावलेले आरोप कोर्टाकडून मान्य करण्यात आले आहेत. करूणा शर्मांना प्रत्येक महिन्याला 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. यामुळे धनंजय मुंडेंना मोठा झटका बसला आहे. दरम्यान आधीच आरोपांमुळे अडचणीत आलेल्या धनंजय मुंडे यांचा पाय आणखीनच खोलात गेला आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी तर कोर्टाचा निकाल येताच धनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी केली आहे. तसेच मुंडे यांच्या पापाचा घडा भरत आल्याचंही तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.
करुणा शर्मा-मुंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप मान्य केले आहेत. त्यामुळे करुणा शर्मा-मुंडे यांना पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. करुणा शर्मा-मुंडे याच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचे या माध्यमातून कोर्टाने मान्य केले आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्यावरील दबाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यासंदर्भात कोर्टाने दिलेल्या निकालानुसार करुणा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले सर्व आरोप कोर्टाने मान्य केले आहेत. करुणा मुंडे या कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरल्या असल्याचे कोर्टाने मान्य केले आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांनी करुणा यांना दरमहा एक लाख 25 हजार तर त्यांची मुलगी शिवानी हिला दरमहा 75 हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. इतकेच नाही तर खटला लढण्यासाठी करुणा यांना 25 हजार रुपये खर्च देण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत. ही पोटगीची रक्कम खटला सुरू झाला तेव्हापासून आतापर्यंत धनंजय मुंडे यांना द्यावी लागणार आहे.