मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारवर आता महाविकास आघाडीचे नेते आक्रमक होत असतांना दिसत आहे. नुकतेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेले आरोप शंभर टक्के खरे आहेत. अनेक गैरप्रकार त्यांनी पुराव्यानिशी पुढे आणले आहेत. मात्र, मंत्री मुंडे यांचा राजीनामा घेतल्यास महायुती सरकारची इज्जत जाणार आहे. हे सरकार बेशरम असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना केला.
शिवभोजन थाळी बंद करून गरजू निराधारांना सन्मानाने मिळणारा तोंडाचा घास हिसकावून घेण्याचा निर्णय आता महायुती सरकार घेत आहे. चार महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ निराधारांना मिळालेला नाही. गरीब निराधारांच्या योजनांना कात्री लावणारे निर्दयी सरकार आज महाराष्ट्रात आहे. खोटे आश्वासन, बेधुंद कारभार आणि स्वार्थी वृत्ती हीच महायुती सरकारची खरी ओळख असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी यावेळी केला.