पुणे : वृत्तसंस्था
राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यापासून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत नियमित सरकारवर हल्लाबोल करीत असतांना दिसून येत असतांना आता यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कि, पिंपरी चिंचवड येथे आज पोलिस आयुक्त कार्यालयाचा भूमिपूजन समारंभ पार पडला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांनी घर खाली केल्यानंतर मुख्यमंत्री तिथे राहायला जात नाहीत. मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर कधी जातील, याच्याशी तुमचे काय घेणे देणे, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संजय राऊत यांना केला. आता वर्षा बंगला पाडून तिथे नवीन बिल्डींग बांधायची, असेही म्हणत आहेत, असा शब्दांत अजित पवारांनी समाचार घेतला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर न जाण्याचे कारणही सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या लेकीची दहावीची परीक्षा आहे. मुलगी एकुलती एक असल्यामुळे ती जे म्हणेल, ते मुख्यमंत्र्यांना ऐकावे लागते. माझी परीक्षा झाल्यावर आपण वर्षावर राहायला जाऊ, असे त्यांच्या मुलीचे म्हटले आहे. कोणीतरी रोज सकाळी टीव्हीवर भोंगा वाजवतो. आता असे होणार, आता तसे होणार, असे ते सांगतात. वर्षावर आमकं पुरलंय, तमकी शिंगे पुरली. यापेक्षा राज्याचे हित कशात आहे, ते बघा, असा टोला अजित पवार यांनी संजय राऊतांना लगावला.