पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीमधील भाजपच्या जास्त जागा निवडून आल्यावर महायुतीमध्ये भाजपचे वजन वाढले आहे. निवडणूक झाल्यापासून महायुतीमधील दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सुरु असून आता पुन्हा एकदा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी मोठी घोषणा केल्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने काही ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, अशी पक्षाच्या शिबिरात कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या त्यासंदर्भात बैठकाही होतील. मात्र, महापालिकेसह जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्रित की स्वबळावर लढायच्या, हे त्या-त्या जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष (अजित पवार) सुनील तटकरे यांनी स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) विभाग व सामाजिक न्याय विभाग यांच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. त्यापूर्वी पत्रकार परिषदेत तटकरे बोलत होते.
या वेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, प्रदेश सरचिटणीस व आमदार शिवाजीराव गर्जे, पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, प्रवक्ते महेश शिंदे, पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, ओबीसी सेलचे अध्यक्ष कल्याण आखाडे आदी उपस्थित होते. या वेळी तटकरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढत आहे.
राज्यातील महायुतीतील घटकपक्ष म्हणून जबाबदारीचे भान ठेवत पक्षविस्तार आणि पक्षसंघटन मजबूत करण्यावर आमचा भर राहणार आहे. महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांचे लवकरच पक्षप्रवेश होणार आहेत. त्यामध्ये मराठवाडा, कोकण, मुंबई, विदर्भातील नेत्यांचा समावेश आहे. काही महत्त्वाच्या नेत्यांच्या पक्षप्रवेशाचे कार्यक्रम त्यांच्या जिल्ह्यात जाऊन करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण लवकरच राज्यव्यापी दौरा करणार आहोत.
राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचाही महाराष्ट्राचा दौरा निश्चित केला जाणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. शिवजयंतीनिमित्त राज्यभर स्वराज्य सप्ताहाचे, तर मराठी भाषा दिनानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का? या प्रश्नाबाबत तटकरे म्हणाले, ’संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली आहे. त्यात तीन प्रकारच्या चौकशा सुरू असून, त्यातून दोषी समोर येतील. दोषी असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच त्यांचा मास्टर माइंड कोण आहे। हे शोधून काढून त्यालाही शिक्षा झाली पाहिजे, अशीच भूमिका आपण सातत्याने मांडली आहे.’ मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सक्षम आहेत, असेही तटकरे यांनी सांगत मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत अधिक भाष्य करण्याचे टाळले.