मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महायुती व महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य वाढत असतांना आता महाविकास आघाडीतील ठाकरे गटाच्या नेत्याने चक्क शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
संजय राऊत म्हणाले कि, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या गद्दाराचा केलेला सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेला लागलेला धक्का लावणारा असल्याची संतप्त टीका त्यांनी केली आहे. दिल्लीत होणारे साहित्य संमेलन हे दलाल व भ्रष्टाचाऱ्यांचे संमेलन असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
शरद पवार यांनी मंगळवारी दिल्लीत आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सोहळ्यात शिवसेनेचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान केला. त्यांच्या या कृतीमुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत चांगलेच संतप्त झालेत. त्यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना या प्रकरणी शरद पवारांवर थेट निशाणा साधला. ते म्हणाले, राज्याचे राजकारण हे फार विचित्र दिशेने जात आहे. कोण कुणाला टोप्या घालत आहे आणि कोण कुणाच्या टोप्या उडवत आहे, कोण कुणाला गुगली टाकत आहे आणि कोण स्वतः हीट विकेट होत आहे हे पुन्हा एकदा समजून घ्यावे लागेल.
ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे सरकार पाडले, बेईमानी केली, त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होते ही आमची भावना आहे. महाराष्ट्रातल्या लोकांपुढे आम्ही कोणत्या तोंडाने जाणार? राजकारणात कुणी कुणाचा शत्रू किंवा मित्र नसतो हे ठीक आहे. पण ज्याने महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआमपणे जाऊन बसलेत, त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणे हे महाराष्ट्राच्या अस्मितेला व स्वाभिमानाला धक्का लावणारे आहे असे आम्हाला वाटते. कदाचित शरद पवारांची भावना वेगळी असेल. पण महाराष्ट्राच्या जनतेला हे काही पटले नाही.
शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, अमित शहांच्या सहकार्याने फोडली व महाराष्ट्र कमजोर केला, अशांना आपण सन्मानित करता, यामुळे मराठी माणसांच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या आहेत. आम्हाला तुमचे दिल्लीतले राजकारण माहिती नाही. आम्हालाही राजकारण कळते. पण काल जे काही झाले ते पाहून आम्हाला नक्कीच वेदना झाल्या आहेत. काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. तुमचे व अजित पवारांचे गुफ्तगू होत असेल. तो तुमचा वैयक्तिक प्रश्न असेल. पण तरीही आम्ही अजित पवारांनी तुमचा पक्ष फोडला, तुमचे कुटुंब फोडले म्हणून याचे भान राखून आम्ही आमचे पाऊले टाकत असतो.