सोलापूर : महापालिकेने प्रिसिजनला दिलेला पुरस्कार हा सोलापूरच्या सर्वोत्कृष्ट अशा कामगारांचा पुरस्कार असून, कामगारांमुळेच प्रिसिजन कॅमशॉप्ट कंपनी सोलापूरचे नाव जगात करू शकली. सोलापुरात चांगले घडू शकते, यावर विश्वास ठेवा. सोलापुरात सर्व सुविधा सहज उपलब्ध होतात. सोलापूरचा विकास निश्चित आहे, सोलापूरकरांनी सोलापूरबद्दल सकारात्मक बोलण्याचा नववर्ष संकल्प सोडावा, असे आवाहन जागतिक कीर्तीचे उद्योजक यतिन शहा यांनी पुरस्काराला उत्तर देताना केले.
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा मानपत्र व सन्मानपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक महापौर श्रीकांचना यन्नम यांनी केले. महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी मानपत्राचे वाचन केले. ज्येष्ठ साहित्यिक व मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष अरण्यऋषी मारुती चितमपल्ली, प्रतिष्ठित उद्योजक यतिन शहा व डॉ. सुहासिनी शहा, ज्येष्ठ विधिज्ञ व जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांचा महानगरपालिकेच्या वतीने सन्मान करण्यात आला. महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते व खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार सुभाष देशमुख, आयुक्त पी. शिवशंकर, सभागृहनेते श्रीनिवास करली यांच्या प्रमुख उपस्थितीत मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी आमदार सुभाष देशमुख, मारुती चितमपल्ली, रजपूत वकील, आयुक्त पी. शिवशंकर यांनी मनोगत व्यक्त केले. आभार सभागृह नेते श्रीनिवास करली यांनी मानले. प्रा.डॉ. ज्योती वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी परिवहन सभापती जय साळुंके, गटनेते रियाज खैरादी, महापालिका उपायुक्त जमीर लेंगरेकर, नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नगरसेविका सुनीता रोटे, नगरसेविका संगीता जाधव, नगरसेविका फिरदोस पटेल, नगरसेविका वहिदाबी शेख, नगरसेविका निर्मला तांबे, नगरसेविका शालन शिंदे, नगरसचिव प्रवीण दंतकाळे, जयप्रकाश अमनगी, शेखर सकट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. व्यासपीठावर न बसवल्याने काही नगरसेविकांनी नाराजी व्यक्त केली.
या यशस्वी सोलापूरकरांचाही झाला सन्मान
मोहन दाते, मुसा खान, ज्येष्ठ पत्रकार राजा माने, स्वप्नील हरहरे, 200 वेळा रक्तदान करणारे अशोक नावरे, जयस्तुते फाऊंडेशन, राजघराना प्रतिष्ठान, इको फ्रेंडली क्लब, हरित वसुंधरा फाऊंडेशन, भक्ती जाधव, अतिश कविता लक्ष्मण शिरसाट, सुप्रिया बिराजदार, श्रीकांत ढेपे, सुरेश जाधव, ऋतिका श्रीराम, नारायण जाधव, प्रार्थना ठोंबरे, वसंत सरवदे, तृप्ती अवताडे, साईश्वर गुंटूक आदींना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. माजी आमदार युनूस भाई शेख व उत्कृष्ट पत्रकार म्हणून विजयकुमार सोनवणे यांना मरणोत्तर सन्मानपत्र दिले व त्यांच्या कुटुंबाने ते स्वीकारले.