मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिवनेरी गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांच्या उपस्थितीत शिव जन्मोत्सवाचा मुख्य शासकीय सोहळा सुरु झाला आहे. सर्व मान्यवर व असंख्य शिवभक्त बालशिवाजी आणि जिजामातेच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी एकत्र आले आहेत. पारंपरिक रीतीने पाळणा हलवण्याचा कार्यक्रम पार पडला. तर सायंकाळी 5 वाजता महाआरती तर 6 वाजता त्यांच्या जीवनावरील विविध पैलूंचे दर्शन घडवणारी भव्य शोभायात्रा निघेल. गडाच्या पायथ्याशी जुन्नरमध्ये छत्रपतींच्या जीवनावरील महानाट्याचा प्रयोग, संगीत रजनी, कुस्ती स्पर्धा, मर्दानी खेळ, फायर शो, बैलगाडा शर्यतीही होत आहे.
छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवर अतिक्रमण राहणार नाही – फडणवीस
छत्रपती शिवाजी महाराज केवळ योद्धे नव्हते, तर ते उत्तम प्रशासक होते. पर्यावरण, जलसंवर्धन, जंगल संवर्धन यासह वेगवेगळ्या प्रकारचे व्यवस्थापन या सर्व व्यवस्थापन शास्त्राचे गुरू हे छत्रपती शिवराय होते. त्यामुळे आदर्श राजा होते. त्यांना आपण जाणता राजा म्हणतो. आपल्या राजांनी स्वत:साठी काहीच केले नाही. आपले संपूर्ण आयुष्य रयतेच्या कामी लावले. म्हणूनच या श्रीमंतयोगाची राजाची आठवण आपण ठेवतो. छत्रपती शिवरायांचे किल्ले आमच्यासाठी कुठल्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत. या किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे, या दृष्टीने सातत्याने आपण काम करत आहोत, त्यातील अडचणी दूर करत आहोत. स्वराज्याची राजधानी रायगडावर अनेक कामे सुरू केलेली आहेत. शिवाजी महाराजांच्या सर्व किल्ल्यावरील अतिक्रमणे काढून टाकण्याचा निर्णय आपण घेतला आहे. काहीही झाले तरी किल्ल्यांवर अतिक्रमण राहणार नाही. त्यासाठी टास्कफोर्स देखील तयार केला आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
वर्ल्ड हेरीटेजसाठी 11 किल्ल्यांचा युनोस्कोकडे प्रस्ताव – उपमुख्यमंत्री शिंदे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांवर जेव्हा जेव्हा येतो, तेव्हा नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. महाराष्ट्रातील गड-किल्ले हे शिवरायांच्या आणि मावळ्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार आहे. देशात आणि विदेशातही या गड-किल्ल्यांची लोकप्रियता आहे. हे गड-किल्ले दगड मातीचे असले, तरी त्यांच्यात शिवरायांनी आणि हजारो मावळ्यांनी प्राण फुंकले आहेत. हे गड-किल्ले इंजिनिअरिंग मार्बल आहेत. महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांचा प्रस्ताव जागतिक ऐतिहासिक वारसा स्थळासाठी युनेस्कोकडे गेला आहे. यामध्ये शिवनेरी किल्ला सुद्धा आहे. शिवाजी महाराजांसारखा आदर्श दुसरा कुठला असूच शकत नाही. आम्ही गड कोट किल्ले, जुनी मंदिरे यांचे जतन आणि संवर्धन सुरू केले आहे. गड-किल्ल्यांवर येणाऱ्या शिवप्रेमींना, पर्यटकांना सुविधा मिळायला पाहिजेत, यासाठी पर्यटनाला उद्योगाचा दर्जा दिला आहे, असे एकनाथ शिंदे यांनी शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव सोहळ्यात बोलताना सांगितले.