अहिल्यानगर : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच देशमुख खून प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जात आहे. मात्र, त्याबाबत एसआयटी नेमलेली आहे. त्याची चौकशी पूर्ण होणे आवश्यक आहे, नाही तर चौकशीचा नुसता फार्स होईल. चौकशीच्या अंतिम अहवालानंतर निर्णय होईल. तर, मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर तीस वर्षांपूर्वीचा तो दावा आहे. कोर्टाने त्यांना जामीन देऊन उच्च न्यायालयात जाण्याची संधी दिल्याने त्यांना आरोपीच्या पिंजर्या उभे करून राजीनामा मागणे योग्य नाही, असे मत जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
मंत्री विखे यांनी अहिल्यानगर येथे पत्रकारांशी संवाद साधला. छावा चित्रपटातील राजेशिर्के यांच्या विधानसंदर्भात विचारले असता ते म्हणाले, मला त्याची कल्पना नाही पण त्यांना कोणी व्हिलन केले असे वाटत नाही. तो इतिहास आहे. तो आपण मान्यच केला पाहिजे. इतिहासाच्या संदर्भाने वास्तव मांडलेले आहे. त्यामुळे कोणाला व्यक्तिगत काही वाटणे योग्य नाही. चित्रपट टॅक्स फ्री झाला पाहिजे.
शिर्डीतील अवैध धंद्याबाबत विचारले असता ते म्हणाले, पोलिस अधीक्षकांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांवरील कारवाईचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार शिर्डीसह सर्वच जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाया सुरू आहेत. अवैध व्यावसाच्या मध्यमातून शिर्डीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होता त्याला चाप बसला आहे. शिर्डी सुरक्षित करण्यासाठी सर्वांनी पाठबळ दिले आहे. अवैध धंद्दे कोणाचेही असो त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अतिक्रमणासंदर्भाच्या कारवाई संदर्भात ते म्हणाले, ब्लू लाईन व रेड लाईनचा पुन्हा सर्व्हे करावा का यावर विचार सुरू आहे.