मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र येणार का? यावर नेहमीच चर्चा सुरु असते. त्यातच विधानसभा निवडणुकीत दोन्ही नेत्यांच्या पक्षांना अपयश मिळाले आहे. त्यामुळे पराभवाच्या छायेत असलेल्या या दोन्ही भावांनी आता एकत्र यावे, अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. त्यातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता जवळ आल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. या दरम्यान मुंबईमध्ये एका कार्यक्रमादरम्यान हे दोन्ही भाऊ एकमेकांसोबत हास्य विनोद करताना दिसून आले. त्यामुळे ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? अशी चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे प्रमुख राज ठाकरे हे मुंबईतील एका विवाह समारंभात एकत्र आले होते. मुंबईतील एका प्रशासकीय अधिकाराच्या मुलाचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या. यावेळी उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यात चांगलाच संवाद रंगला होता. राज आणि उद्धव यांच्यात चर्चा सुरू असतानाच काहीतरी विनोद झाला असावा आणि रश्मी ठाकरे हसतानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या दोघांचे पक्ष एकमेकांसोबत यावे यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. अनेकांनी तसे वक्तव्य देखील केले होते. मात्र दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर कायम आरोप प्रत्यारोप करण्यात आले. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र येतील, अशी शक्यता नव्हती. मात्र आता विधानसभा निवडणुकीत दोन्ही नेत्यांचा पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते एकत्र येतील का? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.
आदित्य ठाकरे पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीला उभे राहिल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांच्या विरोधात उमेदवार न देता अप्रत्यक्षपणे त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र मागील निवडणुकीत राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे दादर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जात असताना उद्धव ठाकरे यांनी त्या मतदारसंघांमध्ये उमेदवार दिला. इतकेच नाही तर उद्धव ठाकरे यांचा उमेदवार या निवडणुकीत विजयी देखील झाला आहे. त्यामुळे अमित ठाकरे यांचा पहिल्याच निवडणुकीत पराभव झलाा. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील राजकारणातील वितुष्ट पुन्हा एकदा वाढले असल्याची चर्चा सुरू आहे.