मुंबई : वृत्तसंस्था
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची मुलगी यात्रेत गेली असताना टवाळखोरांनी त्यांच्या मुलीची छेड काढल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणावरून आता विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीस यांचा गृहखात्यावर आणि गुन्हेगारांवर वचक राहिलेला नसल्याची टीका त्यांनी केली आहे. तसेच, त्यांनी फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा असे म्हटले आहे.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताताईनगर येथे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची मुलगी यात्रेसाठी गेली असतांना या यात्रेमध्ये काही टवाळखोर मुलांकडून खडसे यांच्या मुलीसह काही तरुणींची छेड काढण्यात आली. यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, विरोधी पक्षातील नेत्यांकडून सरकारवर सडकून टीका केली जात आहे. ‘महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारी परिस्थिती महायुतीने निर्माण केली आहे. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे संपली असून राज्यात जंगलराज आणले आहे’, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत सपकाळ म्हणाले की, ‘केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलींची टवाळखोरांनी छेड काढली आणि सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केल्याची घटना अत्यंत चिंताजनक असून राज्यात महिला मुली सुरक्षित नाहीत हे दर्शवणारे आहे. खडसे यांच्या मुलीसह इतर मुलींची छेड काढणाऱ्यांना अटक होत नाही म्हणून केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे पोलीस स्टेशनमध्ये बसून आहेत.’
‘गुंडांना राजाश्रय असल्याने राज्यात महिला मुलींवरील अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या मुली सुरक्षित नाहीत तिथे सर्वसामान्यांच्या लेकरांची काय अवस्था असेल याचा विचार न केलेला बरा. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहखात्यावर आणि गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही’, असेही ते म्हणाले.
तसेच, ‘सुरक्षारक्षक असतानाही मंत्र्यांच्या मुलींची छेड काढली जाते हे कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे निदर्शक आहे. राज्यात माता भगिणी सुरक्षित राहण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदीचा राजीनामा देऊन राज्याला पूर्ण वेळ सक्षम गृहमंत्री द्यावा, असे म्हणत त्यांनी फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘एकनाथ खडसे यांच्या नातीवर छेडछाड करणारे आरोपी हे एका विशिष्ट पक्षाचे आहेत. पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे, इतरांचा शोध सुरू आहे. आरोपींना माफी देता कामा नये, त्यांच्यावर कडक कारवाई होईल’, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे.