पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे येथील स्वारगेट बसस्थानकात २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. सध्या पोलिस कोठडीत असलेल्या गाडेने स्वारगेट प्रकरणात तरुणीवर बलात्काराची कबुली देण्यासोबतच अनेक गैरप्रकार केल्याचे सांगितले. शिरूर परिसरात एका लॉजबाहेर बसून विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलांचे लॉजबाहेर पडताना छुपे व्हिडिओ काढत आरोपी महिलांना ब्लॅकमेल करून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी त्यांना जबरदस्ती करत असल्याची बाबदेखील पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून प्राप्त झाल्याने त्यानुसार चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्यावर यापूर्वी चोरीचे ६ गुन्हे दाखल आहेत. त्यासोबत त्याने अनेक महिलांसोबत गैरप्रकार केल्याचे समोर आले आहे. शिरूर परिसरात अनेक विवाहित महिलांचे अनैतिक संबंध आहेत. या महिला लॉजमध्ये जात असल्याची माहिती त्याला होती. महिला लॉजमध्ये गेल्याचे समजताच तो मोबाइल घेऊन लपून बसे. महिला बाहेर पडताना त्यांचे व्हिडिओ काढत होता. त्यानंतर संबंधित महिलांना एकटे गाठून त्यांना व्हिडिओ दाखवून त्यांच्याशीही आरोपी अनैतिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. स्वतःसह कुटुंबाची बदनामी नको यासाठी अनेक महिलांनी याबाबत तक्रारदेखील दिलेली नाही. त्यामुळे आरोपीचा गुन्हे करण्याचा आत्मविश्वास वाढला होता. त्यामुळे आणखी कोणी पीडित महिला तक्रार देण्यासाठी पुढे येतात का? याचीदेखील चाचपणी करण्यात येत आहे.
दरम्यान, दत्तात्रय गाडे हा घटना घडल्यावर स्वारगेट एसटी स्थानक येथून दुसऱ्या गाडीने गावी गेला होता. तरुणीची तक्रार आल्यावर स्वारगेट पोलिस त्याचा शोध घेत घरीदेखील गेले. मात्र, त्याची कुणकुण लागल्याने आरोपी तीन दिवस गावातील शेतात पसार झाला होता. आरोपी पसार असताना नेमके कुठे कुठे फिरला, त्याला कोणी मदत केली का, याचा शोध घेण्यासाठी आरोपीला पोलिस त्याच्या गावी नेणार असल्याचेही समोर आले आहे.
आरोपी याची लैंगिक क्षमता चाचणी सकारात्मक आल्याने त्याचा केवळ “गे’ असल्याचा दावा संपुष्टात आला आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात त्यादृष्टीने भक्कम पुरावे जमा करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात तपासात कुठलीही चूक होणार नाही याची विशेष दक्षता पोलिस घेत आहेत.