मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज ठाण्यात शिवसैनिकांशी सुसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते ठाण्यात दाखल झाले होते. यावेळी खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, प्रत्येकजण सांगतोय मला राऊत सांहेबांचे भाषण ऐकायचे आहे, पण मी म्हणतोय मला आज बोलायचे नाही, कोणी बोलूच नका. आज शिवसैनिकांना बोलू द्या, पण आज आम्ही जी मोहीम सुरू केली आहे. त्या मोहिमेचा पहिला दिवस किंवा पहिली स्वारी ही ठाण्यावर आहे. मी ठाण्यामध्ये प्रवेश केला नेहमीप्रमाणे आमच्या राजन विचारे साहेबांनी आनंद नगर नाक्यावर स्वागत केले. तेव्हा मी म्हणालो परत एकदा आपले जुने वैभवाचे दिवस सुरू झाले आहेत.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, टेंभी नाक्यावर आलो, धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवाद करण्यासाठी पोहोचलो, तेव्हा पाच पंचवीस महिला समोर आल्या, गद्दारांना महिलांना पुढे करायची सवयच आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वाहक आणि वारसदार आहोत. हे फक्त होर्डिंग लावतात, यांचा वारसदार म्हणून जन्म गुजरातला झाला आहे. जेव्हा शंभर रेडे कापले तेव्हा एक जन्माला आला. त्यामुळे ठाणेकरांना निष्ठा सांगण्याची गरज नाही, ठाणेकरांनी निष्ठा काय असते हे वारंवार महाराष्ट्राला दाखवून दिले आहे.
दरम्यान, संजय राऊत जेव्हा ठाण्यात पोहोचले तेव्हा शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. दोन्ही शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते आमने सामने आले होते. जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. तसेच संजय राऊत यांनी आनंद आश्रमात जण्यापासून देखील रोखले. यावर संजय राऊत म्हणाले, आनंद आश्रमात जाण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. पण आनंद आश्रम कोणत्या तरी खासगी व्यक्तीने आपल्या नावावर करून घेतला आहे. तो आता दिघे साहेबांचा आश्रम राहिला नाही, असे संजय राऊत म्हणाले.