पर्यावरण संवर्धनासाठी अक्कलकोट नगरपरिषदेने उचलले पाऊल
रस्ता दुभाजकामध्ये लावली झाडी, १ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
शहरात झाडी वाढावी आणि पर्यावरणाचे संवर्धन व्हावे यासाठी अक्कलकोट नगर परिषदेने रस्ता दुभाजकामध्ये जास्त उंचीची झाडे लावून शहराचे सौंदर्य वाढविण्याचा निर्णय घेतला आहे याची तात्काळ अंमलबजावणी सुरू केली असून शहरातील मुख्य रस्त्यावर जागोजागी हे चित्र पाहायला मिळत आहे.त्याला जगविण्यासाठी पाणी टाकी, ड्रीप व संरक्षक जाळी बसविण्याचे काम सुरु असल्याची माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली. टप्प्याटप्प्याने १ लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प नगर परिषदेने केला आहे.अक्कलकोट शहरात सर्वत्र रस्त्याची कामे वेगाने सुरू आहेत. वाढती शहराची लोकसंख्या आणि स्वामी भक्तांचा विचार करून शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण करून रस्ते चांगले बनवले जात आहेत.या रस्त्यांची कामे होत असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावलेली झाडे तोडणे ही अपरिहार्यता आहे.
तोडलेल्या झाडांची भरपाई म्हणून पूर्ण झालेल्या कारंजा चौक ते सोलापूर जोड रस्त्याच्या दुभाजकावर नवीन मोहगनीची दहा ते बारा फूट उंचीची झाडे लावण्याचा आणि कोनोकॉर्पसची छोटी झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या संकल्पनेतून आणि कर्मचारी व अधिकारी यांच्या सहकार्यातून नुसते झाडे लावून न सोडता लावलेली सर्व झाडे ही शंभर टक्के वाढ झाली पाहिजेत आणि टिकावीत या दृष्टीने त्या दुभाजकावर ठराविक अंतरावर पाण्याच्या टाक्या लोखंडी स्टॅन्डवर फ्रेमच्या बसवून लावलेल्या प्रत्येक झाडाला ड्रीपच्या सहाय्याने दर दोन-तीन दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ही झाडे जनावरे आणि इतर कारणाने वाया जाऊ नये त्यासाठी त्याच्या दोन्ही बाजूस संरक्षक जाळी बसवणे सुद्धा सुरू आहे. याचा अर्थ लावलेली शंभर टक्के झाड ही उन्हातान्हामुळे किंवा इतर गोष्टींना वाया जाऊ नयेत आणि पर्यावरणाचे संतुलन बिघडू नये आणि शहराच्या सौंदर्यात कोणत्याही प्रकारची बाधा न येता उलट सौंदर्य वाढीस लागावे यासाठी हा पर्यावरण पूरक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. या उपक्रमामुळे शहरवासीयांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
वृक्षारोपणा बरोबरच संगोपन होणार
लावलेल्या झाडांचे संपूर्ण संगोपन करण्यात येणार असून पाणी, जैविक खते वगैरे सर्व गोष्टीचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या पावसाळ्यात आणि वर्षभरात शहरात नव्याने होत असलेल्या रस्त्यांच्या कामासाठी तोडलेले आणि अन्य नवीन ठिकाणी जास्त उंचीची झाडे शहरामध्ये लावून कायापालट करून त्याचे सौंदर्य खुलविण्याचे काम नगर परिषदेमार्फत केले जाणार आहे.
रमाकांत डाके,मुख्याधिकारी