मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीमधील मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवार गटातील आमदारांनी मंत्रीपदासाठी मोठी स्पर्धा सुरु असतांना आता मुंडेंच्या खात्याचा कारभार अजित पवारांनी आपल्याकडे घेतला आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचा कारभार आपल्याकडे घेतला आहे.
सोमवारी संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर एकच संतापाची लाट उसळली आहे. यानंतर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण हे खाते होते. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर त्यांच्याकडील खात्याचा पदभार कोणाकडे जाणार असा प्रश्न उपस्थित झाला होता.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर हा विभाग रिक्त होता. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशनात या खात्याशी संबंधित प्रश्न सभागृहात विचारले जाऊ शकतात. त्यामुळे अजित पवार यांनी तूर्तास या खात्याचा कार्यभार स्वत:कडे घेतला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात या विभागासंबंधीच्या प्रश्नांना आता ते उत्तर देतील. मात्र, अजित पवार हा अतिरिक्त कार्यभार कधीपर्यंत सांभाळणार आणि हे खाते राष्ट्रवादीतील कोणत्या मंत्र्याच्या पदरात टाकणार,याविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एन्ट्री होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे, त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या जागी छगन भुजबळ सक्षम पर्याय आहेत, असे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या जागी बीडमधील आमदारालाच मंत्रिपद देण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. प्रकाश सोळंके आणि विजयसिंह पंडित यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराड हा मुख्य मास्टरमाइंड असल्याचा दावा सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्र केला आहे. वाल्मीक कराड माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. पण सरकारने राजीनामा घेतला नाही. दरम्यान, संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण करतानाचे धक्कादायक फोटो समोर आले. सैतानालाही लाजवेल अशा प्रकारे संतोष देशमुख यांची हत्या केल्याचे या फोटोंमधून दिसून आले. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणे सरकारला भाग होते. त्यांनी तो घेतला.