मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महत्त्वाच्या शक्तीपीठांना जोडणारा शक्तीपीठ महामार्ग १२ जिल्ह्यांतून जाणार असून, यामुळे मराठवाड्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. हा महामार्ग कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला मध्य भारताशी जोडणार असून, समृद्धी महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग आणि शक्तीपीठ महामार्ग असे त्रिकोणी नेटवर्क तयार केले जाईल. यासोबतच कोल्हापूरसह काही भागांत या महामार्गाला विरोध असला तरी, कोल्हापुरातील पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग हवा असल्याची मागणी केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत स्पष्ट केले.
मुख्यमंत्री यांनी राज्यातील १३,९०० किमी रस्ते बांधण्याचा संकल्प केला असून, कोणताही मतदारसंघ डोळ्यासमोर न ठेवता ही कामे केली जाणार आहेत. या अंतर्गत ६,००० किमी हायवे आणि ४,००० गावांना काँक्रिट रस्त्यांनी जोडण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. राज्यातील वाहतुकीच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल घडवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.