बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या समोर हत्या झाली असा नव्हे तर ‘शहीद’ हा शब्द लागू शकतो. त्यांचा जो बळी गेलाय, तो एका प्रवृत्तीच्या विरोधात गेला आहे. त्या प्रवृत्तीला नष्ट करण्याचा विडा आपण सर्वांनी उचलायला हवा, त्यामुळे काँग्रेसच्या वतीने सद्भावना रॅली काढण्यात आली असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. भारताच्या डीएनए मध्ये आणि भारताच्या संविधानामध्ये देखील सद्भावना असल्याचे सपकाळ यांनी म्हटले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात काँग्रेसच्या वतीने मस्साजोग ते बीड अशी सद्भावना रॅली काढण्यात येत आहे. या रॅलीची सुरुवात आज झाली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
ज्या विचारांचे आपण पाईक आहोत. ती शुद्ध भावना आमच्या मनात आहे. ही घटना घडल्यापासून देशमुख कुटुंबीयांचा आणि त्यांच्या कन्येचा बोलताना कुठेही तोल गेलेला नाही. त्यांनी सातत्याने विवेकपूर्ण विचार सर्वांसमोर मांडला आहे. विवेकवादी म्हणून ते आपल्या सर्वांच्या समोर आले आहेत. या परिवाराने सद्भावना जोपासली आहे. त्यांनी कोणत्या धर्माला, कोणत्या जातीला नावे ठेवलेली नाही. त्यामुळे वाईट प्रवृत्ती विरोधात आपण सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
देशमुख कुटुंबीयांनी सद्भावनेचे संरक्षण आणि रक्षण केले आहे. याच सद्भावनेचा ठेवा, त्यांचा संदेश आपण सर्वांनी आत्मसात करायला हवा. राज्यात रोज वेगवेगळ्या घटना घडत आहेत. त्यामुळे आपला समाज बधीर झालाय का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपण साधू संतांचे, महापुरुषांची नावे घेतो. संविधानाचे नाव घेतो, त्यावेळी सर्वांची शिकवण ही सद्भावनाच असल्याचे आपल्या लक्षात येते. या सद्भावण्याच्या विरोधात कोण आहे? याचा थोडा विचार केल्यास फोडा-तोडा आणि राज्य करा, प्रवृत्ती या विरोधात असल्याचे दिसते. ही प्रवृत्ती आज जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले.
अलीकडच्या काळात कुठल्याही निवडणुका नाही. तरी देखील केवळ शुद्ध स्वरूपात आमची ही पदयात्रा आहे. क्रूर पद्धतीने हसून गुन्हेगार हत्या करतात? हा समाज कसा निर्माण झाला? यामुळे माझ्या मनात देखील मला शरमिंदा होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे माझ्या संवेदना देशमुख परिवाराप्रती मी व्यक्त करतो. तसेच जी सद्भावना त्यांनी जोपासली आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. हीच भावना आपल्या लोकशाहीची संरक्षक असल्याचे सपकाळ यांनी म्हटले आहे.