कराड : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार विलासराव पाटील- उंडाळकर (वय ८५) यांचे आज पहाटे अल्प आजाराने सातारा येथे निधन झाले. त्यांच्यावर उंडाळे (ता. कऱ्हाड) येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
काही दिवसांपूर्वी विलासकाका व माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी 30 वर्षाचे वैरत्व संपवून एकत्र काम करण्याची जाहीर कार्यक्रमात घोषणा केली. दरम्यान, गेले काही दिवसांपासून विलासराव उंडाळकर हे आजारी होते. त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज (सोमवारी) पहाटे त्यांचे निधन झाले.
पूर्वीच्या दुर्गमडोंगराळ भागातील उंडाळे येथे जन्मलेल्या विलासराव पाटील यांना त्यांच्या वडिलांचा मोठा वारसा लाभला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांचा वारसा विलासकाका यांनी पुढे चालवला.1962 मध्ये ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संचालक म्हणून काम करू लागले. 1967 पासून ते राजकारण सक्रिय झाले. त्यांनंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
सलग सात वेळा कराड दक्षिण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत ते तब्बल 35 वर्षे आमदार राहिले. त्या दरम्यान त्यांनी सहकार, विधी व न्याय, माजी सैनिक कल्याण, दुग्ध विकास मंत्री म्हणून काम केले. 1999 ला सातारा जिल्ह्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लटेतही कराड दक्षिण मतदारसंघ काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून त्यांनी ठेवला.
अनेक संकटे, प्रलोभने आली पण त्यांनी कधीही काँग्रेस विचारांशी फारकत घेतली नाही. काही दिवसांपूर्वी विलासकाका व माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी 30 वर्षाचे वैरत्व संपवून एकत्र काम करण्याची जाहीर कार्यक्रमात घोषणा केली. दरम्यान गेले काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते.