---Advertisement---

चंद्रकांतदादांचे पत्रलेखन हे उकळत्या किटलीतील रटरटत्या चहासारखे ; शिवसेनेची टीका

On: January 4, 2021 11:29 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी आणि सामना संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहून सामनातील आक्षेपार्ह भाषेबद्दल तक्रार केली होती. दरम्यान, आज पुन्हा एकदा सामना संपादकीयमधून चंद्रकांत पाटलांवर जोरदार टीका केली आहे.  चंद्रकांतदादांचे पत्रलेखन हे उकळत्या किटलीतील रटरटत्या चहासारखे आहे. दादांनी पत्र लिहिणे म्हणजे सगळ्यांचीच दाणादाण उडणार. पुन्हा भाषाशुद्धीची मोहीम त्यांनी सुरूच केली आहे असा टोला लगावताना महाराष्ट्राला एक नवा पत्रमहर्षी लाभला असल्याचं शिवसेनेने म्हटलं आहे.

 

“राज्यातील विरोधी पक्षाला त्यांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये याबाबत प्रशिक्षण देण्याची गरज आहे. बहकलेला विरोधी पक्ष हा महाराष्ट्रातील चिंतनाचा विषय ठरला आहे, पण चिंतन करायचे कोणी? भारतीय जनता पक्षाच्या चिंतन व मंथन बैठका अधूनमधून होत असतात, पण एक महाचिंतन बैठक घेऊन सध्याच्या विरोधी पक्षाने विधायक कार्यात कसे गुंतवून घ्यावे, याबाबत मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत, पण ‘चायपेक्षा किटली गरम’ असे काही लोकांचे सुरू आहे. उठसूट फक्त विरोध, दुसरे काही नाही. ‘‘मुंबईतील महाकाली गुंफा विकू देणार नाही, एक इंचही जागा बिल्डरांच्या घशात घालू देणार नाही’’, अशा विरोधी वक्तव्याच्या उकळ्या काही किटल्यांना फुटल्या आहेत. भाजपच्या ध्यानीमनी, स्वप्नी ‘बिल्डर’च आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही निर्णयात बिल्डरच दिसत असावेत. राज्य सरकारने कोणताही निर्णय घ्यायचा म्हटले की, ‘ब्लॅकमेल’ करणारी किरकिराटी मांजरे आडवी घालायची, हे जणू धोरणच झाले आहे,” अशी टीका शिवसेनेने केली आहे.

 

“पंतप्रधान मोदी हे दूरदृष्टीने विचार करणारे नेते असल्याचे एक विधान श्री. प्रकाश जावडेकर यांनी केले आहे, ते बरोबर आहे. मग ज्या पक्षाचा नेता असा दूरदृष्टीचा आहे, त्या पक्षाचे पदाधिकारी इतक्या अधू दृष्टीचे का बरे? हासुद्धा चिंतनाचाच विषय आहे. म्हणे एक इंचही जागा विकू देणार नाही! तिकडे लडाखच्या हद्दीत चीनचे सैन्य घुसून त्यांनी ‘इंच’भर नाही, तर मैलोनमैल हिंदुस्थानी जमीन कब्जात घेतली आहे. त्यावर या किटल्या का तापत नाहीत, हा प्रश्नच आहे. लडाखची जमीन अगदी इंच इंच पद्धतीने चिन्यांच्या घशात गेली तर चालेल का, तेवढे जरा सांगा. भारतीय जनता पक्षाचे हे ढोंग आहे व या ढोंगाचा बुरखा चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या मशहूर पत्रलेखकांनी आता फाडायलाच हवा,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

 

“चंद्रकांत पाटील हे हल्ली वाचकांची पत्रे, तक्रारी सूचना वगैरे सदरांखाली पत्र लिहून अनेक विषयांना वाचा फोडतात. मुख्य म्हणजे भाषाशुद्धीची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. भाजपामध्ये नवे तर्खडकर उदयास आले असून संपूर्ण भाजपाला त्यामुळे ‘गलिच्छ’ विचार आणि भाषेला तिलांजली द्यावी लागेल. काही चुकीचे बोललात की, पत्रलेखक पाटील त्यांची कागदी तलवार सपकन बाहेर काढतील व ‘तक्रारी सूचना’ सदरात वार करतील. महाकाली गुंफा प्रकरणाचेही चिंतन व संशोधन करून त्यावर पत्ररूपी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी चंद्रकांत पाटलांवरच येऊन पडली आहे. कारण भाजपातील किटल्या उकळत असल्या तरी त्या नको तिथून गळतही आहेत. या गळतीची तक्रार पाटलांनी तत्काळ पत्र लिहून राष्ट्रीय नेतृत्वाकडे करायला हवी,” असा सल्ला शिवसेनेने दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!