अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
जागतिक अग्निहोत्र दिनाच्या पूर्वसंध्येला शिवपुरीत सुप्रसिद्ध गायक अतुल बेले आणि सहकाऱ्यांच्या भजन संध्या कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध झाले. शिवपुरी येथे कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेले भक्तिमय वातावरण,सर्वत्र आकर्षक विद्युत रोषणाई याने या परिसरात रोषणाईचा झगमगाट पाहायला मिळाला. यातच बेले यांच्या सुमधुर गायनाने मंगळवारची संध्याकाळ सुरेल झाली.यावेळी बेले यांनी आपल्या सुमधुर आवाजातून ओंकार स्वरूपा,आरंभी वंदिन अयोध्येच्या राजा ,तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन यासह गीत रामायणातील गीते व अनेक भक्ती गीते सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
यात किबोर्डवर समीर जैन, तालवर अद्वैत खेडकर,तबल्यावर ओंकार कुलकर्णी यांनी साथसंगत केली.यावेळी सुपाली कुलकर्णी यांचेही सुश्राव्य गायन झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल उरणकर यांनी केले.या कार्यक्रमास विश्व फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले,मातोश्री मालादेवी राजीमवाले,डॉ.गिरीजा राजीमवाले, सुधीर कुलकर्णी,राजेश्वरी सिंग,प्रसाद रांगणेकर,डॉ.कीर्ती मेहंदळे,अण्णा वाले, नाना गायकवाड,डॉ.एस.के.कुलकर्णी,विद्याधर पारखे,राणी खानविलकर,योगीराज व्होरा, गायत्री पारखे,वेदवती उरणकर,माधुरी बाग आदिंसह विविध देश विदेशातून आलेले अग्निहोत्र अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.