देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट : एकाच प्रकरणातील न्यायाधीश व निलंबित पोलिस अधिकाऱ्यांसोबत धुळवडीचा आनंद !
बीड : वृत्तसंस्था
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांनी याच प्रकरणात निलंबित झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांसोबत धुळवडीचा आनंद लुटल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणी काही फोटोही पोस्ट केलेत. त्यांच्या या दाव्यामुळे अवघे समाजमन सुन्न करणाऱ्या संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निष्पक्ष सुनावणीवर संशय व्यक्त केला जात आहे.
संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड याला अटक करण्यात आला आहे. सुरुवातीला त्यांना केवळ खंडणीच्या प्रकरणात अटक झाली होती. पण त्यानंतर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या तपास यंत्रणांनी या खंडणीमुळेच देशमुखांची हत्या झाल्याचे नमूद करत वाल्मीक कराड हाच या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी त्यांनी वाल्मीक कराड व इतर आरोपींवर मकोका अंतर्गतही कारवाई केली आहे. विशेषतः स्वतः धनंजय मुंडे यांनाही या प्रकरणी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. सध्या या खटल्याची पहिली सुनावणी नुकतीच पार पडली.
या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांनी या प्रकरणी निलंबित झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांसोबत धुळवड खेळल्याचा आरोप केला आहे. अंजली दमानिया एका पोस्टद्वारे म्हणाल्या, संतोष देशमुख हत्या प्रकरणात निलंबित पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील व याच प्रकरणी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेल्या पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यासोबत या प्रकरणाची सुनावणी करणारे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले रंगांची उधळण करताना दिसून येत आहेत. आरोपींना वाचवणाऱ्या निलंबित अधिकाऱ्यांसोबत केस सुरू असताना न्यायाधीश होळी खेळत असतील तर हे अत्यंत चुकीचे आहे.अंजली दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये फोटो तपासून त्यांची खात्री करण्याचेही आवाहन केले आहे.