लातूर : वृत्तसंस्था
धुलीवंदनाचा आनंद सर्वत्र सुरु असतांना लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लातूर जिल्ह्यातील लातूर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील व्हिक्टोरिया ॲग्रो फ्रूट प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या बग्यासला शुक्रवारी (दि. १४) सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. मार्च एन्डच्या तोंडावर लागलेल्या या भीषण आगीचे खरे कारण अद्याप गुलदस्त्यात असून यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तब्बल सहा तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असुन यात कारखान्याचे मोठे नुकसान झाल्याचे कारखान्याच्या वतीने सांगण्यात आले आहे.
शिरूर अनंतपाळ तालुक्यात एकमेव कारखाना असलेल्या व्हिक्टोरिया ऍग्रो फ्रुड प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मद्य निर्मिती करण्यात येते. हा कारखाना माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मालकीचा आहे. शुक्रवारी सकाळी अंदाजे १०.३० वाजेच्या दरम्यान आग लागल्यामुळे धुरांचे लोळ उठण्यास सुरुवात झाली. काही वेळानंतर कारखान्यातील आर. बिसी बेल्ट, मोटार वायरिंग, बॉयलर, पाइप व इतर साहित्य असलेल्या परिसरात आग लागल्याचे समोर आले. धुलिवंदनाचा सुटी असल्यामुळे कारखान्यात मोजकेच कर्मचारी कामावर होते. त्यांनी सुरूवातीला स्वत:च आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर देवणी पोलीस आणि अग्निशमन विभागास सांगण्यात आले. ही आग जवळपास ४ ते ६ तास सुरू होती. यात लाखो रुपयांचे साहित्य जळाल्याचा संशय आहे. शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांच्या पथकाकडून बीट जमादार गोविंद मलवाडे यांनी घटना स्थळाची पाहणी केली आहे.
या आगीतून निघालेल्या धुराचे लोंढे मोठ्या प्रमाणात परिसरात पसरून धुराचे लोळ आकाशात जमत असल्याचे परिसरातील गावांना दिसत होते. आगीमुळे कंपनीत कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. कंपनीत आग लागल्याचे दिसतात कंपनीतील अधिकाऱ्यांनी शिरूर अनंतपाळ व देवणी नगरपंचायतीशी संपर्क साधून अग्निशामक दलाला पाचारण केले, पण तोपर्यंत आग जास्तच वाढली होती. काही वेळानंतर शिरूर अनंतपाळ व देवणीच्या अग्निशमन दलाच्या वतीने गाड्या पाठवून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. तोपर्यंत कारखान्यातील साहित्यांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.